Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या काका–पुतण्यांचे मृतदेह चार दिवसांनी सापडले; सोनपूर गावात शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, २७ जुलै : पुराडा-बेळगाव नाल्याच्या रौद्र प्रवाहात वाहून गेलेल्या काका-पुतण्यांचे मृतदेह अखेर चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर सापडले. तलवारशहा मडावी (४५) आणि देवसाय मडावी (६५) अशी या दुर्दैवी व्यक्तींची नावे असून, दोघेही सोनपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली असून, निसर्गाच्या या कोपाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

दोघेही २३ जुलै रोजी कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून परतीच्या वाटेवर, पुराडा–बेळगाव दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न येता त्यांनी मोटारसायकलसह ओलांडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात ते दोघेही वाहून गेले. त्याचवेळी मागून येणाऱ्या प्रवाशांनी हा थरारक प्रसंग पाहिला आणि तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी संपूर्ण नाल्याच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्या दरम्यान त्यांची मोटारसायकल सुमारे ३०० मीटर अंतरावर सापडली, मात्र काका-पुतण्यांचा पत्ता लागला नव्हता. मोटारसायकलच्या नंबरवरून ओळख पटवून पोलिसांनी सोनपूर गावात माहिती दिली. गावकऱ्यांनी सरपंच मोहन कुमरे यांच्या नेतृत्वात तीन दिवस अथक शोधमोहीम राबवली, आणि अखेर चौथ्या दिवशी दोघांचेही मृतदेह आढळले.

वैनगंगा नदीत वाढता प्रवाह – गोसीखुर्द धरणातून विसर्ग वाढला

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोसीखुर्द प्रकल्पातून आज सकाळी ५,५८७ क्युमेक्स (१,९७,२८८ क्यूसेक्स) पाणी विसर्ग करण्यात आला असून, धरणातील इनफ्लो अधिक असल्यामुळे पुढील काळात विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्यातर्फे नागरिकांना नदीपात्रात अवागमन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील वाहतूक मार्ग ठप्प

सलग पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय वा अपूर झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत:

1. हेमलकसा – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) – पर्लकोटा नदीवर पूर

2. सिरोंचा – असरअली – जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग (NH-63) – वडधमजवळ वाहतूक फक्त हलक्या वाहनांकरिता सुरू; जड वाहनांसाठी बंद.

3. अहेरी – वटरा रस्ता (राज्यमार्ग 370) – वटरा नाला

4. कुरखेडा – वैरागड रस्ता (राज्यमार्ग 377) – सती नदीवर पूर

5. कढोली – उराडी रस्ता (प्रजिमा-7)

6. हलवेर – कोठी रस्ता (इजिमा-24)

Comments are closed.