Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१९ सप्टेंबरला सर्च रुग्णालयात कर्करोग व मधुमेह विकार आरोग्य तपासणी

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी  कर्करोग (कॅन्सर) ओपीडी, मधुमेह (डायबेटीस/शुगर) विकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता नागपुरचे कर्करोग तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया सर्च रुग्णालय चातगाव येथे तपासणी करिता येणार आहेत.
स्तनांचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तंनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. श्वास लागणे अशक्तपाणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
तोंडात सूज किंवा गाठ येणे, तोंडात रक्त स्त्राव होणे, तोंडाच्या आतील भागात लाल किंवा पांढरे ठिपके दिसून येणे ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. तसेच योनीतील असामान्य रक्तस्त्राव, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती (स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो तो काळ) नंतरही योंनीतून रक्तस्त्राव, पेल्विक वेदना (ओटीपोटातील दुखणे), असामान्य योनीस्त्राव (रक्तरंजीत, पिवळा), वजन कमी होणे,  वेदनादायक लैंगिक संभोग ही  गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे असल्यास कर्करोग ओपीडी मध्ये तपासणी करण्यात येईल. गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना कर्करोग आजाराची औषधी मोफत मिळतील.
 खूप तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सारखे काही इन्फेक्शन होणे, दृष्टी कमी होणे, कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे ही मधुमेहाच्या आजाराची लक्षणे आहेत. ज्या रुग्णांची रक्तातील साखर(शुगर) वाढलेली आहे. अशी लक्षणे आढळल्यास मधुमेह आजार ओपीडी मध्ये मधुमेह विकारतज्ञ डॉ. संकेत पेंडसे नागपुर  तपासणी करतील.येताना आपले जुने रिपोर्ट्स आणावे व शुगर तपासणीसाठी उपाशीपोटी यावे.
  गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी  गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे,  प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०%  सवलत प्रदान करित आहे.  विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. तरी शनिवार दिनांक- १९ सप्टेंबर रोजी होणार्‍या कर्करोग व मधुमेह विकार ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Leave A Reply

Your email address will not be published.