Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील डेंग्यू-मलेरियाचा कहर ;आरोग्य यंत्रणा सतर्क तरीही पाच जीव गमावले

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : मलेरियासाठी देशात सर्वाधिक संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत यंदा डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती भयावह होत चालली आहे. आरोग्य विभागाकडून नियमित उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवात गेल्या पंधरवड्यात डेंग्यूच्या संसर्गामुळे तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची तयारी, त्यांच्या उपाययोजना आणि नागरिकांपर्यंत पोहोचणारी आरोग्य सेवा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुलचेरा तालुक्यातील लगाम आणि येल्ला गावांत डेंग्यूने चार जणांचा बळी घेतला, तर चामोर्शी तालुक्यातील शांतीग्राम येथील एका महिलेचाही मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यू मृत्यूची संख्या पाचवर पोहोचली आहे. याशिवाय, धानोरा तालुक्यातील सिनसूर (मोहली) गावातील एका तरुणासह गेल्या आठ दिवसांत मलेरियामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरची, भामरागड आणि धानोरा परिसरातही डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, आतापर्यंत २०६० मलेरियाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य विभागाकडून फवारणी, जनजागृती, रक्त तपासणी शिबिरे अशा उपाययोजना सुरू असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. डेंग्यूसारख्या प्रतिबंधात्मक आजारावर जिल्ह्यात एकामागून एक मृत्यू होत असतील तर यंत्रणेची कार्यक्षमता कितपत ठोस आहे, नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचते का, आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे खरंच सज्ज आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे.

गावोगाव पाणी साचलेले, नाल्यांची स्वच्छता न होणे, दवाखान्यांतील अपुरी साधनसामग्री, रक्ततपासणीसाठी लागणारी विलंबित यंत्रणा या कारणांमुळे रुग्ण शेवटच्या टप्प्यावरच उपचारासाठी पोहोचत आहेत. मृत्यू रोखण्याऐवजी त्यांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालांतील ‘सतर्कता’ आणि गावकुसातील वास्तव यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट दिसते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात दरवर्षी मलेरिया डोके वर काढतोच, पण यंदा डेंग्यूच्या प्रादुर्भावाने लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. हे चित्र केवळ हवामान वा भौगोलिक परिस्थितीमुळे नव्हे, तर आरोग्य सेवेतली पोकळी, नियोजनातील ढिलाई आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्षामुळे अधिक गंभीर झाले आहे.

आरोग्य विभागाने केवळ जनजागृती न करता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय, ग्रामपातळीवर संसर्ग नियंत्रण, आरोग्य केंद्रांची क्षमता वाढवणे आणि संसाधनांची उपलब्धता याकडे लक्ष दिले नाही तर पुढील काही आठवडे जिल्ह्यासाठी आणखी घातक ठरू शकतात. आता प्रश्न फक्त डेंग्यू वा मलेरियाचा नाही; तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खरंच लोकांच्या जीवावर खेळणाऱ्या साथीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे का हे प्रशासनापुढे आवाहन आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.