गडचिरोली पर्यटन महोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रारंभ : “पर्यटन हेच आर्थिक विकासाचे भक्कम साधन”
गडचिरोलीच्या निसर्गवैभवाला पर्यटन महोत्सवातून रोजगाराच्या संधी.....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : “पर्यटन हा फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव नाही, तर स्थानिकांना रोजगारनिर्मितीचे, तरुणांना उद्योजकतेचे आणि संपूर्ण जिल्ह्याला आर्थिक स्वावलंबनाचे बळ देणारा प्रभावी मार्ग आहे,” असा ठाम संदेश देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज गडचिरोली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन केले. जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२३ ते २७ सप्टेंबर या पाच दिवसांच्या महोत्सवाचा उद्देश केवळ सहलींचे आकर्षण वाढवणे एवढाच मर्यादित नाही, तर जिल्ह्यातील अप्रतिम नैसर्गिक संपदा, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि आदिवासी परंपरा राज्यभर आणि देशभर गाजवणे हा आहे. “पर्यटनातून स्थानिक युवकांसाठी रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात, हस्तकलेला बाजारपेठ मिळू शकते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यामुळे युवकांनी या महोत्सवातील स्पर्धा, कार्यशाळा व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या महोत्सवात सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांपासून ते वारसा स्थळांच्या मार्गदर्शित सहली, स्थानिक लोककला-संगीताचे सादरीकरण, तसेच निसर्गभ्रमंतीसाठी विशेष आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंचशिखरांपासून ते प्राचीन किल्ले, पवित्र मंदिरे, आदिवासी परंपरा आणि हिरव्यागार अरण्यांनी सजलेल्या गडचिरोलीचे वैभव यामध्ये पर्यटकांना अनुभवता येईल.
जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला व्यावसायिक स्वरूप देऊन स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराच्या नव्या दालने खुली करणे, हस्तकला व ग्रामोद्योग यांना बाजारपेठ मिळवून देणे, तसेच ग्रामीण महिलांच्या स्वयं-सहायता गटांना पर्यटकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागचा दीर्घकालीन उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीची ओळख जंगल, खनिज संपत्ती आणि माओवादी समस्या यापुरती मर्यादित राहू नये; तर येथील निसर्गसंपदा, आदिवासी संस्कृती आणि साहस पर्यटन ही जिल्ह्याची खरी ताकद आहे, याचा प्रत्यय या महोत्सवातून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.