आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवून जनतेचा विश्वास मिळवा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गाभा समितीच्या बैठकीत आरोग्य योजनांचा आढावा; सामाजिक अडथळे दूर करून जनजागृती वाढविण्यावर भर.....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 29 : आरोग्य ही केवळ सरकारी योजना नसून, ती प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंबापर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी सजग, समन्वयित आणि उत्तरदायी पद्धतीने काम केले पाहिजे,” असा ठाम संदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.
जिल्हा प्रशासनाच्या गाभा समितीच्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या सर्व योजनांचा सखोल आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) उपस्थित होते.
आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्तरदायित्वावर भर….
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात आरोग्यसेवा केवळ वैद्यकीय उपचारापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे.
आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, माता व बालमृत्यू दर कमी करणे, तसेच सामाजिक अडथळे दूर करून आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
पॅनलधारकांवर कडक कारवाईचे संकेत….
आरोग्य विभागाच्या अटी-शर्तींचे पालन न करणाऱ्या काही पॅनलधारकांबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील टेंडर प्रक्रियेत अधिक कठोर व सुधारित अटी समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. “ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. सार्वजनिक आरोग्य हा कराराचा विषय नाही; तो जबाबदारीचा विषय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कुरखेड्यात बालमृत्यूवर गंभीर दखल — ऑडिटचे आदेश…
कुरखेडा तालुक्यात वाढलेल्या बालमृत्यूंच्या घटनांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तालुका स्तरावर ऑडिट करून तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. “एकही बालमृत्यू निष्काळजीपणामुळे होऊ नये. प्रत्येक प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी होऊन कारणमीमांसा केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
‘मिशन 28’ व ‘मिशन 42’ नव्या स्वरूपात राबविण्याचा निर्णय…
आरोग्य विषयक उपक्रम अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘मिशन 28’ आणि ‘मिशन 42’ या योजनांना नव्या स्वरूपात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यांनी सुचवले की या मोहिमांना नवीन नाव आणि सर्जनशील ओळख देऊन जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावे, जेणेकरून लोकांचा सहभाग वाढेल आणि योजनांची व्याप्ती विस्तारेल.
एटापल्लीतील सामाजिक अडथळ्यांवर बहुआयामी मोहीम राबविणार….
एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द, एकरा बुर्ज, हेटलकसा, देवपाडी, ताडपल्ली आदी गावांमध्ये काही पारंपरिक प्रथांमुळे नागरिक आरोग्य सेवा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पारंपरिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी, बाल विकास अधिकारी, आणि आरोग्य विभागाने संयुक्त जनजागृती मोहीम राबवावी, तसेच आवश्यक असल्यास पोलीस आणि प्रशासनाची मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
माता-बाल आरोग्यासाठी SOP तयार करण्याचे निर्देश….
महिलांच्या पोषण व्यवस्थापन, गर्भावस्थेतील आहार नियोजन आणि प्रसूतिपश्चात काळजी यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या SOPच्या आधारे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना समान मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील, ज्यामुळे सेवांची गुणवत्ता व परिणामकारकता वाढेल, असे ते म्हणाले.
ग्रामपंचायत आणि CSR निधीतून आरोग्य सेवा बळकट करा…
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निधी तसेच उद्योग-उपक्रमांच्या CSR निधीचा उपयोग गर्भवती महिला, बालकांचे पोषण, आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी करण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. “आरोग्याच्या दिशेने समाजाची गुंतवणूक हीच सर्वात मोठी विकासगुंतवणूक आहे,” असे ते म्हणाले.
गाभा समित्यांच्या बैठका नियमित घ्या — अनुपालन अहवाल आवश्यक….
बैठकीच्या शेवटी त्यांनी सर्व प्रकल्पस्तरावरील गाभा समित्यांच्या बैठका दरमहा घेऊन त्यांच्या निर्णयांचे अनुपालन अहवाल वेळेवर सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांनी ‘एकात्म आरोग्य दृष्टिकोन’ स्वीकारावा आणि समन्वयाने काम करावे, असेही आवाहन केले.

