Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पूर्व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी खा. अशोक नेते यांचे केंद्र शासनाला साकडे

  • शून्य काल मध्ये लोकसभेत शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदतीची केली मागणी
  • शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या
  • खा.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 19 मार्च: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र व पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः नष्ट झाले. शेकडो घरामध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिकांना इतरत्र हलवावे लागले. त्यात घरात ठेवलेले धान्य पुर्णतः सडून गेले. या अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र त्यांना शासनाने केलेली मदत अत्यंत तोकडी असून शेतीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती व झालेले नुकसान पाहता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर 10 हजार रुपये म्हणजेच प्रति हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी शुन्य काल मध्ये लोकसभेत केली व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी कडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकसभेत बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल, मागास, अतिदुर्गम, जंगल व्याप्त व नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मात्र गेल्या वर्षी आलेल्या अकाली पुरामुळे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले, घरांचेही मोठे नुकसान झाले, घरातील धान्यही खराब झाले तसेच घरे पडल्याने अनेक शेतकरी बेघर झाले. एवढे मोठे नुकसान झालेले असतांना सुद्धा शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली मात्र अजूनही अनेक गरीब शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अंशतः पडलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी निधीची पूर्तता झालेली नाही, पूर्णतः घरे पडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही घरकुल मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे, असेही यावेळी खासदार अशोक नेते यांनी सभागृहात सांगितले.

पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, केंद्र शासनाकडून 6800 रुपये तसेच राज्य शासनाकडून 6800 असे एकूण 13,600 रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच 5440 रुपये प्रति एकर नुकसानभरपाई घोषित करण्यात आली मात्र ही सरकारची मदत तोकडी असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचेही यावेळी खासदार अशोक नेते म्हणाले. नुकसानीची प्रत्यक्ष स्थिती पाहता शासनाने प्रति एकर 10 हजार रुपये म्हणजेच हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व ज्यांचे नुकसान झाले मात्र सर्व्हेक्षण मधून सुटलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी केली. तसेच गरीब शेतकऱ्यांना यथाशिग्र मदत जाहीर करून घरे पडल्याने बेघर झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ घरकुल मंजूर करण्याची त्यांचा निवासाची यथोचित सोय करण्याची मागणी यावेळी खासदार अशोक नेते यांनी शून्य काल मध्ये लोकसभेत केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.