एटापल्ली–सुरजागड वीजवाहिनीला विद्युत प्रवाह देण्यास सुरुवात : नागरिकांनी घ्यावी काळजी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने एटापल्ली ते सुरजागड दरम्यान १३२ के.व्ही. द्विपथ अति उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले असून, दिनांक १९ मे २०२५ पासून किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी या वाहिनीत विद्युत प्रवाह सोडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शिवारातील नागरिकांनी खबरदारी बाळगणे अत्यावश्यक आहे.
सदर वीजवाहिनी पांडेवाही, डुमे, एटापल्ली, एटापल्ली टोला, एकरा बु., एकरा खु., पेठा, बांदे आणि हेडरी या गावांतील शिवारातून जात आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिक आणि गुराखी यांना खास सूचना देण्यात आली आहे.
धोक्याची सूचनाः नियमभंग टाळा, जीव सुरक्षित ठेवा..
विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यांवर कोणीही चढू नये, त्याचप्रमाणे मनोऱ्यांना गुरेढोरे बांधणे, वाहिनीखाली उंच शिडी, धातूची सामग्री किंवा उंच वस्तू नेणे अशा कोणत्याही प्रकारच्या क्रिया टाळाव्यात. कारण अशा प्रकारच्या निष्काळजी वर्तनामुळे प्राणघातक अपघात होण्याची शक्यता आहे.
भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार सुचना..
ही जाहीर सूचना भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार देण्यात आली असून, सर्व नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी व सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन म.रा.वि.पा.कं. मर्या. चंद्रपूरच्या औदा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
Comments are closed.