Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कट मारून भाजपात एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मनोज सातवी,

पालघर, दि. २२ सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपात प्रवेश केला. दोन्ही माजी आमदारांनी मारलेल्या कोलांट्या उड्यांबाबत पालघर जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा बोईसर मतदार संघातून आमदारकी पदरात पाडून, ऐन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळणार नाही या भीतीने थेट शिवसेनेत प्रवेश केलेल्या परंतु निवडणुकीत पराभव पत्करावा लागणारे माजी आमदार विलास तरे यांनी अतिशय गुप्तपणे भाजपात प्रवेश केला आहे. विलास तरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जात होते. परंतु आज मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होताच विलास तरे आणि पालघर चे माजी आमदार अमित घोडा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड खदखद व्यक्त केली जात आहे.

तर, राष्ट्रवादी मधून पक्षांतर करून शिवसेनेत गेलेले पालघर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे २४ मे २०१५ रोजी निधन झाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अमित घोडा हे सहानुभूतीच्या लाटेवर विजयी झाले होते. परंतु शिवसेनेने सन २०१९ मध्ये आमदार घोडा यांचे तिकीट कापून त्यांच्या ऐवजी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु शिवसेनेच्या दबावामुळे त्यांनी तो मागे घेत सपशेल शरणागती पत्करली होती. त्यावेळी अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा या जिल्हा परिषद अध्यक्ष पद देण्याचेही गाजर दाखवले होते. मात्र हाती काहीच न लागल्याने अमित घोडा हे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारख्या परिस्थितीत शिवसेनेत कायम राहिले होते. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे हे दोन्ही संधी साधू माजी आमदारांना येत्या काळात शिवसेनेच्या ठाकरे किंवा शिंदे गटातून जरी आमदारकीचे तिकीट मिळाले, तरी जनाधार नसल्यामुळे निवडून येण्याची शाश्वती नव्हती. भाजपच्या मोदी लाटेच्या बळावर तरी आपली नैय्या पार होईल या आशेने विलास तरे आणि अमित घोडा या दोन्ही माजी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देत भाजपाची वाट धरली आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही माजी आमदारांना मतदार राजा डोक्यावर घेतो की, त्यांची खरी दाखवतो हे येणारा काळच ठरवणार आहे हे मात्र नक्की.

हे देखील वाचा : 

अजूनही वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो – आ. रोहित पवार

एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्यांनी केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण.

Comments are closed.