Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कारमेल हायस्कूल मध्ये गडचिरोली पोलीसाकडून सायबर जनजागृतीसह विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षाचे धडे

0

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. ३० :  डिजिटल युगाच्या वेगवान प्रवासात इंटरनेटच्या माध्यमातून वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने जनजागृतीचा ठोस उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२५ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने कारमेल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर जनजागृती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ८ वी ते १० वीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीचे धोके, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि डिजिटल व्यवहारांमध्ये आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना ओटीपी शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि फसवणुकीचा प्रकार घडल्यास १९३०/१९४५ या क्रमांकावर अथवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले की, आजच्या डिजीटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र त्याचबरोबर आर्थिक फसवणूक, हॅकिंग आणि माहिती चोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सजगता आणि स्वशिक्षण हेच सर्वात प्रभावी हत्यार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मोबाईलवर घालवला जाणारा वेळ नियंत्रित करून अभ्यास आणि आत्मविकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

या उपक्रमाचा विस्तार फक्त शालेय विद्यार्थ्यांपुरता न ठेवता, संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार पोलीस दलाने केला आहे. सायबर जनजागृती महिना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र येथे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, सायकल रॅली, ऑनलाइन वेबिनार आणि सोशल मीडियावरील प्रचार मोहीम आयोजित करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत १२ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस दलाने ‘सायबर जनजागृती सायकल रॅली’ काढून नागरिकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यशाळेच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोलीस स्टेशन गडचिरोली प्रभारी पोलीस निरक्षक विनोद चव्हाण, स्था गुह शाखा पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, तसेच कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेलजो चेरीयन आणि उपमुख्याध्यापक फादर जॉर्ज वर्गीस उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, उपनिरीक्षक सरीता मरकाम, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि नेहा हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात सायबर साक्षरतेचा विस्तार करण्याच्या या मोहिमेने डिजिटल सुरक्षा आणि नागरिक सजगतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. सायबर युगात जागरूक नागरिक होणे हेच खरी सुरक्षा असल्याचा संदेश या उपक्रमातून पोलीस दलाने प्रभावीपणे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.