फुलांच्या थरांत देवीचा वावर — बतकम्मा उत्सवात महिलांचा निसर्गाशी संवाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहर फुलांच्या रंगीबेरंगी थरांनी सजले. देवी बतकम्माचा हा पर्यावरणपूरक आणि पारंपारिक उत्सव स्थानिकांच्या श्रद्धेचा, सामुदायिक ऐक्याचा आणि निसर्गाशी नात्याचा एक जिवंत पुरावा ठरला.
दक्षिण भारतातल्या तेलंगणा राज्यातील प्राचीन परंपरा असलेला हा उत्सव आता गडचिरोलीतही मुळे घट्ट रोवत आहे. केवळ फुले, पाने यांचा वापर करून देवीची आरास सजवली जाते आणि महिलावर्ग देवीभोवती वर्तुळाकार पारंपारिक नृत्य करतो. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस रोज नवी बतकम्मा देवी साकारून विधीवत पूजा-अर्चा करण्याची परंपरा आहे.
गेल्या दहा वर्षांपासून आरमोरीत या उत्सवाचा भव्य सोहळा होत असून यंदाही तो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. अष्टमीच्या दिवशी जुन्या बसस्थानकातून निघालेली मिरवणूक इंदिरा गांधी चौकातील नवदुर्गा देवी, सुभाष चौकातील शारदा देवी, गांधी चौकातून मार्गक्रमण करत टिळक चौकातील दुर्गामाता मंदिरापर्यंत पोहोचली. ठिकठिकाणी महिलांनी पारंपारिक पोशाखात सजून शिस्तबद्धरित्या नृत्य करून देवीला वंदन केले.
या सोहळ्याला आरमोरी, कुरखेडा, वडसा आणि सिरोंचा येथील तेलुगू भाषिक समाज, कलार समाज बांधव आणि विविध महिला बचत गटांनी मोठा प्रतिसाद दिला. आयोजन यशस्वी व्हावे म्हणून साक्षी बैरवार, अंजु गुरुमवार, सुनिता आंबटवार, रेणू चौलावार, गीता आंबटवार, भाग्यश्री कंकटवार, मंजुषा कंकटवार आदी महिलांनी नेतृत्व केले, तर गणेश बैरवार, श्रीनिवास आंबटवार, राजू कंकटवार यांसारख्या पुरुष मंडळींनीही सहकार्य केले. महाआरती आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व
बतकम्मा उत्सव हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून पर्यावरणाशी असलेली घट्ट नाळ जपणारा उपक्रम आहे. नैसर्गिक फुलांनी देवीची सजावट करणे, महिलांचे सामूहिक नृत्य, सामुदायिक सहभाग — या सर्वातून निसर्ग संवर्धनाचा आणि सामूहिक ऐक्याचा संदेश मिळतो.
या उत्सवाला महाराष्ट्र-तेलंगणा सांस्कृतिक संगमाचे प्रतीक मानले जाते. सिरोंच्यातही या सणाची धूम वाढत असून गडचिरोली जिल्हा हा सांस्कृतिक विविधतेचा सेतू बनला आहे.
Comments are closed.