गडचिरोलीतील विकास कामांवर सुसंवाद!
डॉ. अशोक नेते यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार : गडचिरोली १९ जून २०२५
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय स्तरावर अधिक सुसंवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित करत भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहासजी गाडे यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली.
गडचिरोली येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा, सुरक्षित पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य सेवा, जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा तसेच आदिवासीबहुल भागांतील मूलभूत सेवा पुरवठा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये सकारात्मक व सखोल चर्चा झाली.
डॉ. नेते यांनी यावेळी अनेक प्रलंबित योजनांचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाने त्यास गती द्यावी, अशी विनंती केली. विशेषतः दुर्गम आणि डोंगराळ भागातील पायाभूत सुविधा व सेंद्रिय शेती, आदिवासी शाळा, आणि महिला आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज त्यांनी मांडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी प्रशासनाच्या वतीने चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली असून, स्थानिक जनतेच्या गरजेनुसार योजनांचे अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात विकास आणि जनविश्वास हातात हात घालून चालावं लागेल.”
या भेटीद्वारे विकासाच्या दृष्टीने प्रशासन व राजकीय प्रतिनिधींमध्ये सुसंवादाचे सकारात्मक उदाहरण घालून देण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील विविध योजनांना अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.