मुंबई येथील शीव रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण..
अधिक परिणामकारक उपचारांसाठी लवकर निदान होणे गरजेचे – डॉ. संजीव कुमार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई २ ऑगस्ट २०२२ :- रक्तदाब, मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे निदान वेळच्यावेळी झाल्यास त्यावर अधिक परिणामकारक उपचार करणे शक्य होते. हीच बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या विविध रुग्णालयांमध्ये मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज पहिले ‘मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र’ नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे. तरी या कक्षाचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी आज केले. ते आज शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण नोंदणी कक्षात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण करतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
याप्रसंगी उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) (श्रीमती) निलम आंद्रादे, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, के. ई. एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) विद्या ठाकूर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, ताज ग्रुप ऑफ हॉटेलचे (द इंडियन हॉटेल कंपनी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. पुनीत छटवाल व उपाध्यक्ष श्री. गौरव पोखरियाल, ब्रेस्ट-फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (महाराष्ट्र) च्या डॉ. (श्रीमती) मंगला वाणी व डॉ. प्रशांत गांगल, मुंबई ब्रेस्ट-फिडिंग समितीच्या डॉ. (श्रीमती) सुजाता कान्हेरे, शीव रुग्णालयाचे समुदाय विकास अधिकारी श्री. प्रकाश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आज आयोजित कार्यक्रमांच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण नोंदणी विभाग येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्राचे लोकार्पण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे याप्रसंगी शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी स्वतः अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त महोदयांची रक्तदाब चाचणी केली. याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी सांगितले की, या कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात नोंदणीसाठी येणारे रुग्ण, रुग्णांसोबत येणारे नातेवाईक आणि नागरिक देखील रक्तदाब व मधुमेह चाचण्या करवून घेऊ शकतील. तसेच आवश्यकतेनुसार या कक्षाची चाचणी क्षमता वाढविली जाऊ शकेल.
या अनुषंगाने अधिक माहिती देताना संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शहा यांनी सांगितले की, आजपासून कार्यान्वित करण्यात आलेला हा कक्ष सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीदरम्यान नागरिकांच्या सेवेत कार्यरत असेल. तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत हा कक्ष सुरु असणार आहे. या कक्षामध्ये रक्तदाब व मधुमेह चाचण्या मोफत असणार आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये इत्यादी ठिकाणी याप्रकारचे आणखी १५ कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ व डॉ. कुम्टा स्मृति पुरस्कार प्रदान सोहळा
माता आणि शिशु यांच्या आरोग्यासाठी स्तनपान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने जनजागृती व व्यापक हित लक्षात घेऊन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन जगभरात केले जाते. यानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाचा शुभारंभ आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेत शीव रुग्णालयातील मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिष्ठात डॉ. मोहन जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमादरम्यान मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. त्यानंतर स्तनपान विषयक जनजागृती व मार्गदर्शन याबाबत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना देण्यात येणा-या डॉ. एन. बी. कुम्टा स्मृति पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदा श्रीमती शुभा सुब्रह्मण्यम आणि श्रीमती अमिता शहा यांना ‘डॉ. एन. बी. कुम्टा स्मृती पुरस्कार’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स’ (द इंडियन हॉटेल कंपनी) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पुनीत छटवाल व उपाध्यक्ष श्री. गौरव पोखरियाल या मान्यवरांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींना डॉ. एन. बी. कुम्टा स्मृति पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.
ब्रेल लिपीतील ‘आरोग्य मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाद्वारे आरोग्य व आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आरोग्य मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन यापूर्वीच करण्यात आले होते. याच पुस्तकाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी द ब्लाईन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) चे अध्यक्ष अरुण भारस्कर हे विशेषत्वाने उपस्थित होते. यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना श्री. भारस्कर यांनी आरोग्य मार्गदर्शिका यासारखे अत्यंत उपयुक्त पुस्तक ब्रेल लिपीतून प्रकाशित करण्यास सहकार्य केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व शीव रुग्णालयाचे आभार मानले.
हे देखील वाचा :-
Comments are closed.