Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – डॉ.विद्याधर बन्सोड

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर : एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत चालली असून व्यावहारीक असलेल्या इंग्रजी भाषेचा पगडा सर्वसामान्यांवर झालेला दिसून येतो. आपल्या बोलीभाषेची लाज न बाळगता त्याचा अभिमान बाळगणे ही सुद्धा भाषा संवर्धनाची पायरी आहे. त्यामुळे मराठी भाषेत संवाद करणे, भाषेचा प्रचार-प्रसार करणे, भाषेची वाचन संस्कृती जोपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. विद्याधर बन्सोड यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकीता ठाकरे, प्राचार्य जयवंत टोंगे, प्रा. राजेश बारसागडे, वैशाली मुसळे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या बोलीभाषेवर प्रेम करा, असे सांगून डॉ. विद्याधर बन्सोड म्हणाले, नुसतं पुस्तकी बोलण्याने मराठी भाषा टिकणार नाही. तर आपल्या मातृभाषेतून बोलणे, संवाद साधणे खुप महत्वाचे आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. कोणत्याही भाषेचा द्वेष करू नये. आपण सर्व जी भाषा बोलतो, ती अभिजात भाषा आहे. केंद्र शासनाच्या पुढाकाराने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. असेही त्यांनी सांगितले. तसेच जगातील सर्व भाषांवर प्रेम करा, मोबाईल न वाचता पुस्तके वाचा व ज्ञान आत्मसात करा असा मोलाचा सल्ला देखील डॉ. बन्सोड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकीता ठाकरे म्हणाल्या, भाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. तंत्रज्ञानाच्या युगात देखील मराठी भाषेचे संवर्धन करणारे लोक आजही आहेत. भाषेच्या संवर्धनाची सुरुवात स्वत:पासून व्हावी, असे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रास्ताविकेत बोलतांना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर म्हणाले, जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कुल, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाषा ही मनातील भाव व्यक्त करण्याचं उत्तम साधन आहे. भाषेने माणुस समृद्ध होत असतो. बोलण्यातून व्यक्तीमत्वाचं दर्शन घडत असते. आपण सर्व महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगावा, असे जिल्हा माहिती अधिकारी श्री. येसनकर म्हणाले.

यावेळी प्राध्यापक राजेश बारसागडे, वैशाली मुसळे यांनी मराठीचे महत्व, जतन व संवर्धनाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुशील सहारे यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.