Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशातून, राज्यातून, परदेशातून आलेल्या साहित्यिक, मराठीप्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले.

आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीकरिता कसे नेता येईल यादृष्टीने चॅट-जीपीटी सारखे एखादे ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फर्ग्यूसन महाविद्यालय येथे संमेलनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हा दर्जा देण्याचे भाग्य लाभले असा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रमाण मराठीच्या माहेरघरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वयाच्या चौथ्या वर्षी साहित्याच्या निर्मितीला सुरूवात करुन अजूनही वयाच्या 93 व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देताना आनंद होत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या संमेलनाला महाराष्ट्रातून, इतर राज्यातून, परदेशातून मराठीप्रेमी, साहित्यिक आले असून मराठी भाषा विभागाने खऱ्या अर्थाने हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचे केले आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोचलेला नाही. दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर म्हणून दाखवले हे पाहून अभिमान वाटला की मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

भाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन, संपर्काचे साधन असते आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे देखील साधन असते. म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे राज मान्यता मिळाली आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच, प्राचीन भाषा होतीच परंतु कुठल्याही भाषेला राज मान्यता मिळणे देखील महत्त्वाचे असते. मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती; त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढून स्वराज्याची भाषा मराठी भाषा करुन मराठीला राजमान्यता देण्याची खऱ्या अर्थाने सुरूवात केली.

मराठीची मुळे खोलवर गेलेली आहे. आपली मराठी भाषा काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी तिची गोडी वाढतच जाते. किंबहुना मराठीच्या बोलीभाषांत निर्माण झालेले साहित्य, त्याचे प्रकार व बोलीभाषातील काव्य आदींची गोडी वेगळीच असून मनाला अतिशय मनाला भावनारे असल्याचे पहायला मिळते.

मराठी माणूस हा कधीही स्वार्थी राहिला नाही. पानिपतच्या लढाईत मराठे हे आपले साम्राज्य वाढवण्याकरता नव्हे तर भारताचे रक्षण करण्याकरता गेले होते. त्यावेळी मराठ्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर अहमदशहा अब्दालीने तहाचा लखोटा दिला होता की पंजाब, सिंध आणि मुलतान दिल्यास उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा राहील. पण मराठ्यांनी संपूर्ण अटकेपर्यंतचा भारत हे हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचा राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे अशी भूमिका घेतली आणि ते पानिपतमध्ये लढले. ही ताकद, क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात तयार केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकोबारायांनी आपल्याला दिला होता तो वैश्विक विचार मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे. या विचारामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे.

संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग असो, संत चोखा मेळा यांचा सामाजिक समतेचा संदेश, संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या त्याचे कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करत होती.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हा जो नारा दिला किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये स्फूरण दिले. दादासाहेब फाळके यांनी सिने सृष्टीची निर्मिती केली, गान कोकिळा लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर आदी अनेक नावांची मांदियाळी आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मराठी असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना येतो. या संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला हीच मराठीची परंपरा पुढे नेण्याचीच नव्हे तर जगभरात मराठी जगवायची, टिकवायची, समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साद देखील घालत आहोत.

आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थाने नाट्य संस्कृती टिकवली आहे. त्याच्यामध्ये पहिले नाव आपल्या मराठी रंगभूमीचा आम्हाला घ्यावं लागेल. हे जे काही सगळे आपल्या मराठी माणसाने जतन करून, संवर्धन करून ठेवले आहेत ते पुढे नेण्याकरता आपण सर्वजन या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. त्यासाठी आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रचारासाठी करायचा असतो. असा प्रयत्न मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करण्याचा करत असताना स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करुन आपले अभिजात साहित्य पुढील पिढीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध होईल असा प्रयत्न मराठी भाषा विभागाने करावा.

इंग्लंड मधील मराठी मंडळाला त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात आवश्यक ती मदत येत्या पंधरा दिवसांमध्ये निश्चितच देण्यात येईल. तसेच दिल्लीतली मराठी शाळा देखील अव्याहत चालल्या पाहिजेत याकरितादेखील महाराष्ट्र शासन आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.