Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी कार्यालयात धान आणणार: शेतकरी कामगार पक्षाने दिला इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

धान खरेदी तात्काळ सुरू करण्याची केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १० मार्च: जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या धानाची सुरु असलेली खरेदी गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण देत थांबविण्यात आल्याने सत्तर टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचा धान घरीच पडून असल्याने तात्काळ धान खरेदी सुरू न केल्यास शेतकऱ्यांचा धान जिल्हाधिकारी कार्यालयात आणून शासनाला सोपवण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाच्या धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी आत्तापर्यंत पुर्ण होणे अपेक्षित असतांना संपूर्ण जिल्हाभरात साठवणूकीची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून धान खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे ७० टक्के शेतकऱ्यांचे धान खरेदी अभावी घरीच पडून आहेत. धानाची शासकीय खरेदीच थांबल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले असून शेतकऱ्यांचा संयम संपलेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.       

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्फत जिल्ह्यात तात्काळ धान खरेदी सुरु न झाल्यास शेतकरी शासकीय खरेदी योजना तसेच बोनस पासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान घरीच उंदीर, घुशींना वाया जावून नासधूस होण्यापेक्षा आणि वर्षभर कष्ट करुनही खरेदी अभावी आर्थिक कुचंबणा करवून घेण्यापेक्षा सदर शेतकऱ्यांचा धान आपल्या कार्यालयात आणून शासनाला सोपवण्यात येणार असून सदर धानाची हिफाजत करण्याची जबाबदारी आपली असणार आहे. असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, संजय दुधबळे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर, रमेश चौखुंडे, दामोधर रोहनकर, गंगाधर बोमनवार,प्रदिप आभारे, विजया मेश्राम यांनी दिलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.