गोंडवाना विद्यापीठात २२ जुलैला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, प्रतिनिधी – ‘एक हात मदतीचा, दुसरा संधीचा’ या भावनेतून गोंडवाना विद्यापीठात दिनांक २२ जुलै २०२५ रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध नामवंत कंपन्यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांच्या भविष्यास नवसंजीवनी देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या या मेळाव्यात नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना तसेच नवउद्योजकांसाठी भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात एल.आय.सी. गडचिरोली, ए.आर. इंडस्ट्री, आदिवासी बांबू सहकारी संस्था, एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स, विदर्भ इंजिनिअरिंग, आर्या कार्स, मुथुट फायनान्स, वैभव एंटरप्रायझेस, व्हिनस ऑटोमोटिव्ह, क्विस स्टाफिंग सोल्युशन्स अशा विविध क्षेत्रातील नामवंत संस्था आपापल्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करतील.
इन्स्युरन्स अॅडव्हायझर, मशीन ऑपरेटर ट्रेनी, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, सेल्स कन्सल्टंट, टेक्निशियन, फ्लोअर सुपरवायझर, रिलेशनशिप ऑफिसर, एच.आर., डीलर सेल्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंट ऑफिसर, पॅन्ट्रीमेड, सिक्युरिटी गार्ड, प्रोडक्शन ट्रेनी अशा शंभरहून अधिक पदांवर भरती होणार असून, ही संधी ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराचा झरा घेऊन येणार आहे.
फक्त रोजगारच नव्हे तर स्वयंरोजगाराचाही विचार करणारांसाठी शासनाच्या विविध महामंडळांमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शनही या मेळाव्यात मिळणार आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांना रोजगाराच्या नवद्वारापर्यंत नेण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments are closed.