Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी उत्पादने विक्रीसाठी विशेष केंद्र उभारण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय योजना सादर करावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 16 जानेवारी: जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन विक्रीचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि तांत्रिक माहिती प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्यक्ष आणि ऑनलाइन विक्रीसाठी प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले.

आत्मा, स्मार्ट प्रकल्प व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पंडा बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक आप्पा धापटे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांसह शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात सध्या 68 शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत असून, त्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे. या कंपन्यांनी तातडीने व्यवसाय योजना तयार करून सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्याचे भात हे पीक वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावर नवीन प्रकारचे इनोवेशन कसे करता येईल, यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच धान्य व इतर उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता असल्याचे नमूद करत गोदाम संबंधित सर्व योजनांचे एकत्रीकरण करून शासनाकडून जिल्ह्यासाठी विशेष गोदाम योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी माहिती जाणून घेतली. बैठकीला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे चंद्रशेखर भडांगे, रमेश बारसागडे, मुकेश वाघाडे आणि इतर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.