अहेरी–प्राणहिता रस्तात खड्डे, की खड्ड्यात रस्ता, जीवांचा धोका, प्रशासन गप्प – किती जीव जावे लागतील?
न्यायालयीन खेळी, लोकप्रतिनिधी - प्रशासनाचे मौन - जीवाच्या बदल्यातच डांबरीकरणच?..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी शहरातून प्राणहिताकडे जाणारा अवघा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आज जिल्ह्याच्या अपयशाचे प्रतीक बनला आहे. उद्घाटनानंतर दोन वर्ष उलटल्या, तरी डांबरीकरण अपूर्ण. रोजच्या अपघातांनी, जखमी नागरिकांनी आणि तरुणांच्या स्वप्नांच्या उद्ध्वस्त होण्याने हा मार्ग ‘जीवांचा प्रश्न’ बनला आहे. अहेरीकरांचा एकच प्रश्न: “जीव गमावल्याशिवाय हा रस्ता पूर्ण होणार नाही का?”
सकाळी हनुमान मंदिर चौकावर एका शिक्षिकेची स्कूटी उखडलेल्या गिट्टीवरून घसरली; डाव्या डोळ्यात गंभीर जखम, रक्तस्राव सुरू. थोड्याशा फरकाने प्राणघातक जखम टळली. काही महिन्यांपूर्वी याच वळणावर एका महिलेला जीव गमवावा लागला होता. लक्ष्मण नाल्याजवळील खड्ड्यांमुळे महिला पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली, तर अहेरीतील एका युवकाला अपघातानंतर पायाला इजा झाली. ही काही उदाहरणे; रस्त्यावर दररोज अशा दुर्घटनांचा सिलसिला चालतो.
डांबरीकरणाचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले, पण दोन वर्षांनंतरही अपूर्ण आहे. नागरिकांनी आंदोलन केले – भाग्यश्री आत्राम व अमोल मुक्कावार यांनी दोनदा, तर अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांनी स्वतंत्रपणे रस्त्यासाठी आवाज उठवला. प्रसार माध्यमांनीही वेळोवेळी बातम्या दिल्या; तरी बदल शून्य राहिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला नोटिसा दिल्या; ठेकेदार न्यायालयात धावला. प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगून विभागाने हात झटकले. निर्णयाला आणखी वर्षभर लागल्यास किती जीव जाईल, किती अपघात होतील, असा जळजळीत सवाल नागरिकांकडून विचारला जातो.
हा मार्ग फक्त वाहतुकीसाठी नाही, तर उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्राणहिता पोलीस आणि सीआरपीएफ हालचालीसाठी महत्त्वाचा आहे. स्वच्छ भारत मोहिमेचे जयघोष करणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी दररोज या मार्गावरून जातात. तरीही खड्डे दिसत नाहीत. शहर स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमा राबवल्या जातात, परंतु मुख्य मार्ग बेवारस आहे.
नगरवासीयांचा संयम संपत चालला आहे. “रस्ता सुरू होतो, आंदोलन होते, नोटिसा जातात, पण खड्डे तसचेच. न्यायालयात केस आहे म्हणून आम्ही जीव धोक्यात घालावा का?” अशी चिंता नागरिक व्यक्त करतात.
दक्षिण गडचिरोलीच्या या प्रमुख मार्गाची दुरुस्ती आजही अधांतरी आहे. आदिवासी बहुल दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग जीवनावश्यक आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील खेळीमुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रगती अडकलेली आहे. स्थानिक जनता आणि कर्मचाऱ्यांसाठी हा मार्ग जीवनरक्षक असताना, अपूर्णतेमुळे तो मृत्यू-धोक्याचा मार्ग ठरला आहे.
अहेरी–प्राणहिता रस्त्याची दुरुस्ती आता केवळ काम नाही, तर जिवांची किंमत किती आहे याचा प्रश्न बनला आहे. जिल्हा प्रशासन, ठेकेदार, अधिकारी आणि न्यायालय – सर्वांच्या गतीचा परिणाम नागरिक भोगत आहेत. या रस्त्याचा अपूर्णपणा अधिक काळ सहन होत नाही. आता कार्यवाही अनिवार्य झाली आहे, नाहीतर पुढील जीवांचा फटका अपरिहार्य ठरेल.
Comments are closed.