अवैध रेती उत्खनन प्रकरणी सिरोंचा मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित.. जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
तहसीलदारांच्या बदलीची शिफारस विभागीय आयुक्तांकडे..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीवर अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल यंत्रणेतील ढिलाईवर कठोर पवित्रा घेत मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी कु. अश्विनी सडमेक यांना तत्काळ निलंबित केले आहे, तर तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा वाढता सुळसुळाट आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेली बेफिकिरी याबाबत माध्यमांतून सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्याकडे सखोल चौकशीचे आदेश दिले. २ ऑक्टोबर रोजी मौजा मद्दीकुंठा आणि चिंतरेवला येथील रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका तपासणीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळला असून त्यावर २९ कोटी रुपयांहून अधिक दंड आकारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. चौकशीत दोन जेसीबी, एक पोकलँड मशीन आणि पाच ट्रक अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचेही उघड झाले.
या प्रकरणात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केवळ निष्काळजीपणा दाखवला नाही, तर आपल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. महसूल विभागाच्या शासन नियमांनुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीघाटांवर नियमित पाहणी करून अवैध उत्खननाबाबत वरिष्ठांना अहवाल देणे आवश्यक असते; मात्र कु. अश्विनी सडमेक यांनी ही जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी रेतीघाटावरील पाहणी, नोंदी आणि नियंत्रण या सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याचे आढळल्याने त्यांनाही १५ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले.
तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या एकूण नियंत्रणाच्या अभावामुळे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद करत त्यांच्यावर कारवाई व बदलीची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला स्पष्ट इशारा दिला आहे की, “अवैध रेती उत्खनन, गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक आणि या प्रकारातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कठोर शिक्षेला सामोरे जाईल. कोणताही गैरव्यवहार अथवा संगनमत शून्य सहनशीलतेच्या भूमिकेतूनच हाताळला जाईल.”
सिरोंचा तालुक्यातील या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात महसूल विभागात खळबळ माजली आहे. रेती माफियांविरोधातील ही प्रशासकीय कारवाई केवळ एक चेतावणी नसून, ‘रेती माफियांवर आणि निष्काळजी अधिकार्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा लोखंडी हात’ असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.