Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहा वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण, 62 लाखांचे इनामी नक्षली शरणागती पत्करून पुनर्वसनाच्या प्रवासाला सुरुवात…

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २४ सप्टेंबर: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात दशकानुदशके हिंसाचाराचे सावट पसरवणाऱ्या माओवादी चळवळीला आज आणखी एक निर्णायक झटका बसला. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या समोर तब्बल ६ जहाल व वरिष्ठ माओवादी नेत्यांनी शस्त्र ठेवत आत्मसमर्पण केले. यामध्ये दोन डिव्हीजनल कमिटी मेंबर (DVCM), एक कमांडर, दोन पॉलिट ब्युरो मेंबर (PPCM) आणि एक एरिया कमिटी मेंबर (ACM) असा भलामोठा कॅडर आहे. या सहा जणांवर राज्य शासनाने एकूण ६२ लाख रुपयांचे इनामी बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणातील प्रमुख नावे…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (५८) – उत्तर बस्तर डिव्हिजन मास टीम, DVCM दर्जा.

• विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक (५६) – माड डिव्हिजन, डीके प्रेस टीम इंचार्ज, DVCM दर्जा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

• कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी (३४) – पश्चिम ब्युरो टेलर टीम, कमांडर.

• नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (३९) – कंपनी क्र.१०, PPCM दर्जा.

• समीर आयतू पोटाम (२४) – दक्षिण ब्युरो टेक्निकल टीम, PPCM दर्जा.

• नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (२८) – अहेरी दलम, ACM दर्जा. 

या गटावर खून, चकमक, जाळपोळ यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून, महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील प्रकरणांची तपासणी सुरू आहे. तरीही हिंसक जीवनाला कंटाळून व शासनाच्या पुनर्वसन योजनेवर विश्वास ठेवत या वरिष्ठ माओवादी नेत्यांनी आज सन्मानाचे आयुष्य स्वीकारले.

गडचिरोली पोलीस दलाची भक्कम पकड…

सन २०२५ मध्ये आतापर्यंत ४० जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, २०२२ नंतर हा आकडा तब्बल ७३ वर पोहोचला आहे. महाराष्ट्र शासनाने २००५ पासून आत्मसमर्पण व पुनर्वसनासाठी सुरू केलेल्या योजनांमुळे आतापर्यंत ७१६ नक्षलींनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. यातील मोठा वाटा गडचिरोली जिल्ह्याचा आहे, ज्यामुळे दंडकारण्यातील माओवादी नेटवर्क कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे अधिकारी सांगतात.

महासंचालकांची उपस्थिती, वीर जवानांचा गौरव…

एकलव्य हॉल, गडचिरोली येथे झालेल्या समारंभात DGP रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सी-६० कमांडोंचे विशेष सत्कार करण्यात आले. कवंडे, कोपर्शी–फुलनार आणि मोडस्के जंगल परिसरातील अलीकडील चकमकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक आणि त्यांच्या विशेष पथकांचा गौरव करण्यात आला. या चकमकींमध्ये एकूण ११ कुख्यात माओवादी ठार झाले होते.

त्याचबरोबर, नक्षल हिंसाचारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य DGP शुक्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

“शांततेचा मार्ग निवडा” – रश्मी शुक्ला यांचे आवाहन…

जवानांचे अभिनंदन करताना DGP शुक्ला म्हणाल्या,“गडचिरोली पोलीसांनी केलेले उत्कृष्ट कार्य हे केवळ प्रशंसनीय नाही, तर देशातील इतर भागांसाठी आदर्श आहे. उर्वरित माओवादी बंधू-भगिनींनी हिंसाचार सोडून लोकशाहीच्या प्रवाहात सामील व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.”

यानंतर त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या अतिसंवेदनशील कवंडे पोलीस पोस्ट ला भेट देऊन सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांशी संवाद साधला. कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करणाऱ्या दलाच्या धैर्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

शासनाची प्रोत्साहनपर पुनर्वसन योजना….

आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवादीसाठी केंद्र व राज्य शासन एकत्रित ४.५ ते ८.५ लाखांपर्यंत आर्थिक मदत देत आहे. पती-पत्नीने एकत्र शरणागती पत्करल्यास अतिरिक्त १.५ लाख रुपये, तसेच गटाने सामूहिक आत्मसमर्पण केल्यास ४ लाखांचे प्रोत्साहन दिले जाते. भिमन्ना–विमलक्का दाम्पत्यासह नागेश–कविता या जोडप्यांना याचा लाभ होणार आहे.

निर्णायक टप्पा…

१ जानेवारी २०२५ रोजी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य ताराक्का सिडामसह ११ नक्षली आणि ६ जून २०२५ रोजी १२ वरिष्ठ माओवादींच्या आत्मसमर्पणानंतर आजचा मोठा गट शरण आल्याने माओवादी चळवळीची पकड कमकुवत होत असल्याचे स्पष्ट होते. गडचिरोली पोलीसांची धोरणात्मक मोहीम, स्थानिक जनतेचा वाढता विश्वास आणि शासनाची पुनर्वसन-समावेशन धोरणे – या त्रिसूत्रीमुळे दंडकारण्यातील दशकानु दशकं रुजलेला दहशतवाद आता मावळतीकडे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.