Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ताकतोड्याच्या शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीची परवानगी

  • हाती पैसा नाही, बँका बंद असल्याने पिककर्जही मिळेना.
  • कोरोनाची भिती नाही पण आदेशाची भिती वाटते – नामदेव पतंगे, स्वाभीमानी शेतकरी संघटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगोली, दि. ४ मे: जिल्हयात यावर्षी कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, बाजारात शेतीमालास भाव नाही, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले, आता बँका बंद असल्याने पिककर्ज मिळत नाही. त्यामुळे शासनाने गांजा लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी ताकतोडा (ता.सेनगाव) येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत पतंगे यांनी शासनाकडे तसेच महसुल व पोलिस विभागाकडे निवेदन पाठविले आहे. मागील वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. यावर्षीही कोरोनाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन लागू केल्यामुळे पंधरा दिवस घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे.

कृषीनिविष्ठा विक्रीची दुकाने उघडी असली तरी दुकानावर होणाऱ्या गर्दीने कोरोना पसरण्याची भिती आहे. त्यातच यावर्षी अद्यापही बँकांनी पिककर्ज वाटप केलेले नाही. शासनाने बँकांचे व्यवहार पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे बँकेत शेतकऱ्यांना येऊ दिले जात नाही. आता पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. हाती पैसा नाही त्यातच शासनाकडून दररोज वेगवेगळे आदेश काढले जात आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर देखील मेटाकुटीला आला आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या शेतकऱ्यांकडे पेरणीसाठीही पैसा नाही. तर बँकेकडून कर्ज मिळत नाही. आता बँका सुरु झाल्यानंतर कर्ज प्रस्ताव कधी सादर करावे अन कर्ज कधी मिळावे हा प्रश्‍न आहे. त्यातच पुन्हा बँकेत गर्दीमुळे कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे आता शासनाने शेतात गांजा लागवडीची परवगानी द्यावी अशी मागणी पतंगे यांनी केली आहे. तर शेतकरी पतंगे यांच्या अजब मागणीही प्रशासन देखील अडचणीत सापडले आहे.

कोरोनाची भिती नाही पण आदेशाची भिती वाटते
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून वेळोवेळी आदेश काढले जात आहेत. प्रत्येक वेळी वेगळे आदेश मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कधी बाजारपेठे उघडणार तर कधी बँका बंद राहणार या आदेशांमुळे आता कोरोनाची भिती नाही पण आदेशाची भिती वाटते आहे.

– नामदेव पतंगे, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना

Comments are closed.