Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घनदाट जंगलाच्या कुशीत दडलेले पर्सेवाडा धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: जिल्हा निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हिरवेगार अरण्य, उंचच उंच डोंगररांगा, पावसाळ्यातील ओघळणारे झरे आणि धबधबे या सर्व गोष्टींनी ही भूमी पर्यटकांसाठी खऱ्या अर्थाने खजिनाच आहे. पण दुर्दैवाने प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक ठिकाणे अजूनही पर्यटन विकासापासून वंचित आहेत. अशाच दुर्लक्षित खजिन्यांपैकी एक म्हणजे सिरोंचा तालुक्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (३५३ सी) लगत, बेज्जूरपल्ली फाट्यापासून अवघ्या आठ किलोमीटरवर मुळावाही गावाजवळ वसलेला पर्सेवाडा धबधबा. आज तो हळूहळू साहसप्रेमी आणि नैसर्गिक सौंदर्याची आस असलेल्या पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे.

दोन डोंगरांच्या दरीतील मोहक दृश्य…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुळावाही गावातून पर्सेवाड्याकडे जाताना आधी लिंगो जाँगो पेटाणा या धार्मिक स्थळापर्यंत वाहनाने सहज जाता येते. यानंतर केवळ एक किलोमीटर पायपीट केली की घनदाट जंगलाच्या पायवाटेने चार लहान नाले पार करावे लागतात. त्या मार्गावरचा थंडगार वारा, पानांतून डोकावणारे सुर्यकिरण आणि पूर्ण शांततेत पक्ष्यांचे किलबिलाट पर्यटकांना एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. शेवटी जेव्हा दोन डोंगरांच्या मधल्या दरीतून अचानक हा धबधबा दिसतो, तेव्हा त्याचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते. वर्षाचे बारा महिने पाण्याने समृद्ध असलेला हा धबधबा आजघडीला नैसर्गिक संपत्तीचा जिवंत पुरावा आहे.

सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येथील लिंगो जाँगो धार्मिक केंद्र केवळ आध्यात्मिक दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासोबतच तेलंगणा आणि छत्तीसगडमधून हजारो भाविक येथे येतात. बेज्जूरपल्ली, मुळावाही, रेगुलवाही, मोतुकपल्ली, जारजपेठा या गावांतील नागरिक स्वतः पैसे गोळा करून जनरेटर भाड्याने आणतात, भाविकांसाठी भोजनाची सोय करतात. शासनाकडून कोणत्याही सोयी नसतानाही ग्रामीण जनता आपल्याकडील संसाधनांतून धर्मभाव टिकवून ठेवते, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

पर्यटन विकासाची तीव्र गरज..

हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि सामाजिक ऐक्य या तिन्ही दृष्टींनी समृद्ध असूनही अद्याप शासनाकडून कोणतीही सोय उपलब्ध नाही. वीजपुरवठा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नीट नाहीत, शेड किंवा बसण्यासाठी जागाही नाही. त्यामुळे हजारो पर्यटक असूनही हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित आहे. स्थानिकांची ठाम मागणी आहे की शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मूलभूत सुविधा पुरवाव्यात. पर्यटन विभागाने पुढाकार घेतल्यास पर्सेवाडा धबधबा केवळ सिरोंचा तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवू शकतो.

पर्यटनाला नवी चालना..

गडचिरोलीच्या जंगलात सुरक्षित पर्यटनाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्सेवाडा धबधबा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. थोड्याशा नियोजनाने आणि सरकारी मदतीने हे ठिकाण इको-टुरिझमसाठी विकसित करता येईल. स्थानिकांना रोजगार मिळेल, सांस्कृतिक वारसा जपला जाईल, आणि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल.

Comments are closed.