Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वामनदादा कर्डक यांच्या कवितेतून समाज प्रबोधनाचे कार्य होते – ज्येष्ठ विचारवंत डॉ. रविचन्द्र हडसनकर

लोककवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली दि.२०: देशभरात लोकशाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिभावंत कलाकार प्रबोधनकार वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाचे फार मोठे प्रबोधन होऊन गती मिळाली आहे. वामनदादांनी लिहिलेल्या कविता, गझला त्यांच्या समग्र साहित्या मध्ये राष्ट्रवाद दिसून येतो असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी प्रा. डॉ. रविचन्द्र हडसनकर यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठामध्ये लोककवी वामनदादा कर्डक अध्यासानचे प्रा. डॉ. रविचन्द्र हडसनकर हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे हे होते.
याप्रसंगी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, लोककवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रस्तावक तथा अधिसभा सदस्य डॉ. दिलीप चौधरी, लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन समिती सदस्य डॉ. सागर जाधव, डॉ. इसादास भडके, डॉ. केशव मेंढे, अनिरुद्ध वनकर, अध्यासनाचे समन्वयक सहा. प्राध्यापक रोहित बापू कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हडसनकर म्हणाले, वामनदादा कर्डक यांनी सदैव माणसाच्या हिताचे गाणे लिहिले. त्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत एक नव चैतन्य निर्माण केले होते. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची चळवळ आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लेखणीतून घराघरांत पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण काम वामनदादांनी केलेले आहे. अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकाशित तसेच अप्रकाशित साहित्याचा होणारा अभ्यास हा अनमोल ठेवा असेल.

श्रीराम कावळे म्हणाले,अक्षरांची ओळख नसताना अथक परिश्रमातून वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दहा हजारांपेक्षा अधिक गीतांची रचना करून, आंबेडकरी चळवळीला फार मोठे बळ दिले आहे. वामनदादा कर्डक यांचे कार्य केवळ देश नव्हे तर जागतिक पातळीवर पोहचवण्याच्यादृष्टीने अध्यासनाचे कामकाज होणे आवश्यक आहे. यावेळी सागर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत समन्वयक रोहित बापू कांबळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. दिलीप चौधरी यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले.
कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चैतन्य शिनखेडे, प्रा.अमोल चव्हाण, डॉ. हेमराज निखाडे, श्रीरंग कावळे, निता कन्नाके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.