Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी

मोखाड्यातील आसे गावातील धक्कादायक घटना मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी व त्यातून आत्महत्या ही घटना अत्यंत वेदनादायी. - विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मोखाडा २०ऑगस्ट:  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली. काळू पवार (४८) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव असून, त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी  रामदास कोरडे या  मालकाकडून ५०० रुपये उसने घेतले होते. ते पैसे  फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळुला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची  पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांच्या मोखाडा तालुक्यातील कातकरी वाड्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराला मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली आणि

वेठबिगारीच्या पाशात अडकुन आत्महत्या करावी लागते ही अत्यंत गंभीर व वेदनादायी आणि व्यावस्थे बाबत चीड आणणारी घटना आहे असे म्हणत   पंडित यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोखाडा तालुक्यातील आसे गावात कळू पवार व पत्नी सावित्री (४३) थोरली मुलगी धनश्री (१५) व धाकटी मुलगी दुर्गा (१३) हे कातकरी कुटुंब शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. २०२० च्या दिवाळी सणाच्या ५ दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (१२) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, आपल्या पोटच्या गोळ्याचे अंतिम संस्कार करण्यासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी करावी लागली, त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी  म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

 

मुलाच्या कफनासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी काळू मालकाकडे गडी म्हणून राबत होता.  शेती नांगरणे, गुरे हाकणे अशी कामं तो करत असे. परंतु नेहमी मालकाकडून त्याला मारहाण तसेच शिवीगाळ होत असे. आत्महत्येच्या  दोन दिवस अगोदर तब्बेत ठीक नसल्यामुळे काळू कामावर गेला नाही म्हणून मालक रामदास याने त्याला मारहाण केली होती, त्यामुळे बाबा प्रचंड तणावात असल्याचे थोरली मुलगी धनश्री सांगते.   त्यामुळे मालक रामदास कोरडे याच्या जाचाला कंटाळून दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास काळू याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे.

प्रकरणी मोखाडा पोलिसांनी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात  “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. श्रमजीवी संगतानेने या प्रकरणी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मालक रामदास अंबु कोरडे हा देखील आदिवासी आहे.

 

हे देखील वाचा :

उद्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारही असणार उपस्थित

 

चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण?

Comments are closed.