Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहा डायकेम दुर्घटनेतील कामगाराचा अखेर मृत्यू

कंपनीसह कारखाना निरीक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोरधरत आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

रोहा, 19 जून – धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीच्या कोळसा व कच्चा माल गोदामाला मागील आठवड्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. त्या भीषण आगीत प्रयाग डोलकर हा तरुण कामगार गंभीर जखमी झाला. पायाला दुखापत व पाठीमागून भाजल्याचे समोर आले. डोलकर याच्या तब्बेतील सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असतानाच रविवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रयाग डोलकर याच्यावर तब्बल बारा दिवस ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. तरुण होतकरू प्रयाग डोलकर याच्या अपघाती जाण्याने खारापटी गावासह सबंध विभागात शोकाकुल वातावरण झाले आहे. दरम्यान, धाटाव एमआयडीसीतील एक्सेल, युनिकेम, साॅल्वे, दीपक नायट्रेट, ट्रान्सवर्ड, कोरस यांसह बहुतेक कंपन्यांत वारंवार घडणाऱ्या अपघातात अनेक कामगारांना जीव गमवावे लागल्याने समस्त कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर विविध अपघाती घटनांवर काही राजकारणी राजकारण करत आपापली पोळी भाजत आलेत, असे अनेक उदाहरणे अप्रत्यक्ष अधोरेखीत झाले, त्यातूनच कारखाना निरीक्षक, एमपीसीबी प्रशासन अधिकारी अधिकच निढावल्याने अपघाती घटनांत वाढ झाली हे सुद्धा आता खेदाने बोलावे लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कायम धोकादायक कंपनी म्हणून सर्वश्रुत आहे. सुरक्षेचे सर्वच नियम पूर्वीपासून धाब्यावर बसविले. कामगारांना सेफ्टी साधने नाहीत. स्वतंत्र सेफ्टी इन्चार्ज नाही, हे अगदी स्पष्ट होते. याच गंभीर घटनांकडे कारखाना निरीक्षक विभागाने कधीच लक्ष दिले नाही. यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या नाहीत. यामागे कारखाना निरीक्षक प्रशासन अधिकाऱ्यांचे खाते धोरण कारणीभूत होते असा आरोप वारंवार झाला. कंपनी प्रशासनाने कामगार सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचनांकडे जाणीवपूर्वक व नफ्याच्या दोलनमानातून कारखाना निरीक्षकाने दुर्लक्ष केल्याने वारंवार अपघात झाले. याउलट काहीच बोध न घेतलेल्या रोहा डायकेम कंपनीत पुन्हा ७ जून रोजी आगीची मोठी दुर्घटना घडली. कोळसा व कच्चा माल गोदामाला भर दुपारी भीषण आग लागली. त्या आगीची तीव्रता प्रचंड होती. संपूर्ण एमआयडीसी अक्षरशः काळकुट्ट झाली, याच आगीच्या दुर्घटनेत तरुण कामगार प्रयाग डोलकर गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारार्थ ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलविले. मात्र आगीने पाठीत गंभीर दुखापत केली. तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असतानाच प्रभाग डोलकर याचा रविवारी सायंकाळी दुर्दैवी अंत झाला आणि शेकडो कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या धोकादायक ठरत आहेत. मागील चारपाच वर्षात घडलेल्या अपघातात अनेक कामगारांना जीव गमवावा लागला. यात एक्सेल, युनिकेम, दीपक नायट्रेट कायम आघाडीवर राहिल्या. एक्सेल, युनिकेम कंपनीच्या कामगार मृत्युमुखी घटनेला जबाबदार धरत कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल झाले. दुसरीकडे कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेत बदल करण्याकडे कारखाना निरीक्षक, एमपीसीबी प्रशासन अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. यातूनच अपघातांच्या घटना कायम सुरू राहिल्या. त्यामुळे कारखाना निरीक्षक, एमपीसीबी अधिकारीही अपघाती घटनांना जास्त जबाबदार आहेत, असा आरोप होत असतानाच सुरक्षेबाबत बेजबाबदार असलेल्या रोहा डायकेम कंपनीतील आगीच्या दुर्घटनेत तरुण कामगार प्रयाग डोलकर याला जीव गमवाला लागला. डोलकर याच्या मृत्यूला कारणीभूत धरत कारखाना निरीक्षक अधिकारी, कंपनी प्रशासन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. याबाबत आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनीही चिंता व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रोहा डायकेममध्ये सुरक्षेबाबत त्रुटी असू शकतात, सुरक्षेबाबत सुरक्षा अधिकारी, कंपनीचे प्रमुख यांची लवकरच बैठक घेण्याचे प्रायोजन आहे. अपघात घडू नयेत याबाबत उपाययोजनांसाठी जागृती केली जाईल, अधिकाऱ्यांना कडक भाषेत सुनावले जाईल, अशी प्रतिक्रिया बारदेशकर यांनी दिली, तर रोहा डायकेम कंपनीतील अपघातात तरुण कामगाराचा बळी गेला, कंपनीत कामगारांची सुरक्षा रामभरोसे होती, तुम्ही गांभीर्याने कधीच घेतले नाहीत, मग तुमच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नयेत, असे कारखाना निरीक्षक केशव केंद्र यांना दूरध्वनीवरून विचारताच ते कमालीचे निरुत्तर झाले. दरम्यान, तरुण कामगाराच्या मृत्यूला जबाबदार धरत कंपनीचे अधिकारी यांसह कारखाना निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन सबंधीत प्रशासनाला रोहा प्रेस क्लब देणार आहेत. लोकप्रतिनिधी व कामगार संघटना कामगार सुरक्षेबाबत जाणीवेने कमी पडत असल्याने आम्ही कामगार हितार्थ जबाबदारी पुन्हा नव्याने स्वीकारली आहे अशी प्रतिक्रिया प्रेस क्लबने दिली. तर तरुण कामगार मृत्यू प्रकरणी सबंधीत कंपनी अधिकारी, कारखाना निरीक्षक यांच्यावर नेमकी काय कारवाई होते ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.