Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा ; शेतकरी कामगार पक्ष

३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार : भाई रामदास जरते यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : सुरजागड सह जिल्ह्यातील विविध पारंपारिक इलाखे, ग्रामसभा आणि राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वेळोवेळी ठराव घेऊन निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही शासनाने जिल्ह्यातील लोह खाणी रद्द न केल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात ३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शेतकरी कामगार पक्षातर्फे म्हटले आहे की, भारताचे संविधान आणि कायदे व नियमांच्या तरतुदी आणि न्यायिक हक्क तसेच अधिकार, संस्कृती, जगण्याची खरीखुरी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणासाठी जिल्हाभरातील ग्रामसभा, पारंपारिक इलाखे आणि राजकीय पक्ष, संघटनांनी मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील लोह खाणींना विरोध दर्शविला आहे. मात्र सुरजागड येथे बळजबरीने पोलीस बळाचा वापर करून लोह खाण खोदण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पेसा कायद्याच्या तरतुदी असतांनाही, त्यानुसार स्थानिक ग्रामसभा, ग्रामसभांचा समूह आणि पंचायतीचा वैध पध्दतीने ठराव पारित झालेलाच नाही. त्यामुळे मे. लाॅयड्स मेटल्स यांना सदर लोह खाणीकरीता दिली गेलेली मंजूरी आणि त्याकरिता शासनाच्या विविध विभागांनी राबविलेली मंजुरी प्रक्रिया अवैध आहे.

त्याकरिता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी बेकायदा सुरू असलेले खाण काम थांबवून यासंबंधातील खातरजमा करून संपूर्ण मंजुरी प्रक्रिया रद्द होण्यास्तव शासनाच्या विविध विभागांकडे तात्काळ शिफारस करावी, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांनी दिलेल्या मंजूऱ्यांसह लोह खाण कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, जैव विविधता कायद्यानुसार केंद्र व राज्य सरकारची असलेल्या कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, कायदे आणि नियमांना तिलांजली देऊन मोठ्या विध्वंसक पध्दतीने संपत्तीची विल्हेवाट लावून जैविक विविधतेला बाधा पोहचविण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरचे बेकायदा खाण काम कायमस्वरूपी थांबविण्यात आले नाही तर यापुढे मोठा जैविक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी शहानिशा करून खाणकामासंबंधात करण्यात आलेला करारनामा कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत राज्य व केंद्र शासनाच्या संबंधित विभागांना कळविण्यात यावे, सुरजागड इलाख्यातील संपूर्ण ७० गावांचे कृषीपूर्व समाजाचे धारणाधिकार हक्क मान्यतेची कार्यवाही पूर्ण होण्याआधीच खाणीचे बळजबरीने काम सुरू करुन कायदेशीर हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे वनहक्क कायद्याची प्रस्तावना आणि पीटीजी च्या बाबत असलेले आंतरराष्ट्रीय संदर्भाचेही मोठे उल्लंघन शासनाकडून झालेले आहे.

त्यामुळे बळाचा वापर करून बळजबरी सूरु करण्यात आलेले खाणकाम विनाविलंब थांबविण्यात यावे, हेडरी ते खाणीपर्यंत हजारो झाडांची कत्तल करून नियमबाह्य पद्धतीने तयार केलेल्या रस्त्याची चौकशी करावी, बांडे, मोहुर्ली, हेडरी, मलमपाडी, सुरजागड या ग्रामसभांना त्यांच्या पारंपारिक गाव हद्दीतील संपूर्ण क्षेत्राचे सामुहिक वन हक्क आणि सुरजागड पारंपारिक इलाख्याचे कृषीपूर्व समाजाचे धारणाधिकार हक्क मान्यतेची कार्यवाही करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सदर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

सोबतच कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील लोह खाणीसाठी संबंधित कंपनीला जनतेच्या विरोधानंतरही सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्यात यावी व जिल्ह्यातील संपूर्ण २५ लोहखाणी तातडीने रद्द कराव्यात या मागण्यांसाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

जिल्ह्यात लागू असलेले प्रतिबंध आणि कोविड च्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सदर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील खाण विरोधी जनतेने सदर आंदोलन ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

 

Comments are closed.