Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भ्रष्टाचाराचे कुरण भाग: ४ ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा केवळ दिखावा…

नियम बाह्य,भ्रष्ट कर्मचाऱ्यांची पाठराखण कायम..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

ठाणे, मनोज सातवी 3 जानेवारी 2023 – वन विभागाच्या ठाणे मुख्यालयात (THANE CCF OFFICE)पदोन्नती न घेता केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी एकाच खुर्चीवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी करण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर सध्या ठाणे वन वृत्ताअंर्तगत चर्चेचा विषय ठरला आहे. ठाणे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातल्या या भ्रष्ट कारभाराविरोधात काही सामाजिक संस्थानी मुख्यमंत्री, वनमंत्री, वन विभागाचे सचिव,प्रधान मुख्य वन संसरक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर लोकस्पर्श न्यूजने हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर ही थातूरमातूर कारवाई करण्यात आली असून, यातून नियम बाह्य काम करणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम वन विभागाकडून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे येथील मुख्य वन संसरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे, मुख्यलेखापाल चंद्रकात सोनजे,ए बी सांगळे यांनी पदोन्नती नाकारल्या तसेच भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या प्रकरणानंतर ठाणे मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या या कर्मचाऱ्यांविरोधात काही सामाजिक संस्थानी मुख्यमंत्री, वनमंत्री, वन विभागाचे सचिव,प्रधान मुख्य वन संसरक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारी नंतर मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. यावर ठाणे मुख्य वनसंरक्षक श्रीमती के प्रदिपा यांनी चौकशी करण्याची तयारी केली. मात्र ही चौकशी केवळ बहाणा असल्याचे समोर आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदोन्नती नाकानाकारूनही घेतलेला एक स्तर अधिक चा पगार वसूल करणार का ?
१९९९ पासून ठाणे मुख्यालयात काम करणाऱ्या ए बी सांगळे यांची पदोन्नती नाकारल्या नंतर शहापूर विभागीय कार्यालयात बदली दाखविण्यात आली होती. लोकस्पर्श न्युजने बातमी प्रसारित केल्यानंतर सांगळे यांना पुन्हा शहापूर येथे बदली करावी लागली आहे. मात्र यापूर्वी शहापूर येथे बदली होऊनही हजर न होणाऱ्या सांगळे यांनी शहापूर कार्यालयातील एक स्तर अधिक चा पगार गेल्या ७ महिने घेतला आहे. या अतिरिक्त पगाराची वसुली केली जाते का हेही पहावे लागेल.

कारवाईची संगीत खुर्ची
ठाणे मुख्यालय कार्यालयातील बदली नाकारणाऱ्या मुख्यलेखापाल चंद्रकात सोनजे यांच्या खुर्चीची केवळ संगीत खुर्ची खेळण्यात आली. त्यांची अन्य कार्यालयात बदली न करता कागदपत्रावर मुख्यालयातच सांगळे यांच्या लेखा विभागात बदली दाखविण्यात आली आहे. आज ही सोनजे मुख्यालयात ठाण मांडून येथेच कार्यरत आहेत.आस्थापना, जमिन टेबल ला चिटकून बसलेल्या सोनजे यांची बदली ही केवळ पानं पुसण्याचे काम असल्याची चर्चा वन विभागात सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर यांना ठेवलं अंधारात

पदोन्नती नाकारणाऱ्या मुख्यलेखापाल सोनजे आणि सांगळे यांच्या बदली कुठे करण्यात आल्या याचा अहवाल प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी ठाणे सिसीएफ कार्यालयाकडे मागविला होता. मात्र ठाणे सिसीएफ श्रीमती के प्रदिपा यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक यांना अंधारात ठेवत माहिती दिलेली नसल्याची माहिती नागपूर मधून मिळत आहे. मंत्रालय, प्रधान मुख्य वनसरक्षक कार्यालयाच्या सूचनांचा अवमान करत चंद्रकात सोनजे,ए बी सांगळे यांची पाठराखण मुख्य वन संरक्षक के प्रदिपा का करत आहेत..? हा सवाल पुढे केला जात आहे.चौकशी च्या नावावर केवळ कागदोपत्री बदली दाखविण्यात आली तिही नियमाला धरून नाही. प्रशासकीय अधिकारी हा राजपत्रित अधिकारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे अधिकार हे मंत्रालय स्तरावर आहेत.अश्यात ठाणे मुख्यालयातील प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे यांच्याविरोधात झालेल्या तक्रारी नंतर यांची चौकशी करण्यात यावी असे ठाणे सिसीएफ यांनी मंत्रालयात का कळविले नाही ? अशी चर्चा सध्या सुरु आहे. या अधिकारी कर्मचाऱ्याकडून शिस्तभंग करण्यात आल्याचे स्पष्ट होत असतांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक अधिनियम १९७९ आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ अंर्तगत या अधिकारी,कर्मचाऱ्यांविरोधात इतक्या तक्रारी असतांना विभागीय चौकशी सुरु न करता केवळ बदल्यांची संगीतखुर्ची खेळत केलेली ही कारवाई वन विभागात संशयास्पद विषय ठरत आहे.

प्रशासकीय अधिकारी सोपान गिऱ्हे,मुख्यलेखापाल चंद्रकात सोनजे,ए बी सांगळे,अरुणकुमार जाधव यांच्यावरील आरोप,तक्रारीनंतर कारवाईचा दिखावा करणाऱ्या ठाणे सिसीएफ यांच्यावर वनमंत्री,वन विभागाचे सचिव,प्रधान मुख्य वनसंरक्षक नियमबाह्य चौकशी केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलणार का हे पहावे लागेल.

हे पण वाचा –

CCF कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व मुख्य लेखापाल यांचा धुडगूस..

 

भ्रष्टाचाराचे कुरण भाग : ३ वसुलीसाठी नियमबाह्य नियुक्ती..? वन विभागात होतेय “यांच्या” नावाची चर्चा..

Comments are closed.