Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच; आयुक्तांची माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २१ नोव्हें :- दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला असून मुंबईत देखील परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. गेले ५ महिने मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे, असे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक मुलाखतीत बोलताना म्हटले.

एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येवर चहल यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. असे असले तरी मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत. तीन ते चार आठवड्यानंतर मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. स्वीमिंग पूल, शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणांवर सध्या कोणताही परिणाम होणार नाही, असे चहल यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.