Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठीला दिला प्रतिष्ठेचा दर्जा; गोंडवाना विद्यापीठात NEP अंतर्गत ‘मराठी साहित्य’ मुख्य अभ्यासक्रमात

विद्यार्थ्यांच्या भाषिक संवेदनशीलतेला चालना देणारा ऐतिहासिक निर्णय, स्थानिक संस्कृतीच्या जोपासनेत विद्यापीठ आघाडीवर...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आता मराठी साहित्याचा समावेश पदवी अभ्यासक्रमाच्या मुख्य आणि वैकल्पिक विषयांमध्ये करण्यात आला आहे. ‘मराठी साहित्याचे स्वरूप’ या ग्रंथाचा समावेश प्रथम वर्षाच्या अनिवार्य विषयामध्ये करण्यात आला असून, ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक, आधुनिक मराठी कविता आणि प्रवासवर्णन यांसारख्या साहित्यिक प्रकारांद्वारे भाषेचा अभ्यास अधिक सखोल आणि समृद्ध होणार आहे.

विद्यापीठाच्या मानवशास्त्र विद्याशाखेच्या अखत्यारीतील अभ्यास मंडळांनी NEP च्या चौकटीत अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांच्या भाषिक जाणीवा, स्थानिक संदर्भ आणि साहित्याच्या सौंदर्यदृष्टिकोनांचा समतोल राखला आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेला OE (Open Elective), VSC, ACE, FP आणि Major अशा सर्वच विभागांत मानाचे स्थान देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन संबंधित अभ्यास मंडळाची तातडीने बैठक घेतली आणि नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट मार्गदर्शन दिले. त्यानुसार, चालू सत्रातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्रात आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय सत्रापासूनच नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

स्थानिक भाषेला दिली मान्यता…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणतीही भाषा साहित्यानेच समृद्ध होत असते, आणि विद्यापीठाने ही बाब अत्यंत सजगपणे लक्षात घेतल्याचे दिसते. भाषा केवळ व्याकरण नव्हे तर अनुभव, संस्कृती, आणि अभिव्यक्ती यांचे माध्यम असते — ही जाणीव अभ्यासक्रम रचनेतून ठळकपणे जाणवते. मराठी भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शुद्ध लेखनाचाच नव्हे, तर समकालीन साहित्य, ग्रामीण वास्तव आणि लोकसाहित्याचा अनुभवही मिळणार आहे.

साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनात विद्यापीठाची भूमिका…

गोंडवाना विद्यापीठ गेल्या काही वर्षांत स्थानिक संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या जपणुकीसाठी सातत्याने झगडत आहे. दोन युवा साहित्य संमेलने, एक झाडीपट्टी नाट्य महोत्सव, तसेच ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळाले आहे. मागील वर्षी आयोजित केलेल्या नाट्यलेखन आणि मराठी विश्वकोश लेखन कार्यशाळा हे या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण ठरले होते.

राजकीय वा सामाजिक पूर्वग्रहांना फाटा…

मराठी साहित्याच्या अभ्यासक्रम समावेशावर कोणताही राजकीय वा सामाजिक पूर्वग्रह नसून, NEP च्या निकषांनुसार अभ्यासक्रम रचना झाली आहे. प्रत्येक अभ्यास मंडळाला आपल्याला आवश्यक त्या कलाकृती निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, मराठी भाषा विषयाचे स्वरूप केवळ अनिवार्यतेपुरते मर्यादित न राहता व्यापक सांस्कृतिक शिक्षणाच्या दिशेने झुकले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…

या निर्णयामुळे ग्रामीण व आदिवासी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून बौद्धिक जडणघडण करण्याची संधी मिळेल. मराठी विषयाला दिलेले महत्त्व केवळ भाषिक ओळख टिकवण्यापुरते न राहता, स्थानिकतेचा आत्मसन्मान जागवणारे ठरणार आहे.

Comments are closed.