Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत जिल्हाभरात स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे यशस्वी आयोजन..

गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली – दुर्गम व अतिदुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडाण” या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. ०५ चे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील एकूण ३४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या प्रगल्भ अभ्यासवृत्तीचे दर्शन घडवले.

“एक गाव एक वाचनालय” या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वाचनालयांमध्ये एकाच वेळी हा सराव पेपर घेण्यात आला. तसेच, गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृह येथेही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या स्पर्धा परीक्षेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता वाढवणे, तसेच भविष्यात येणाऱ्या पोलीस भरती, वनरक्षक आणि विविध सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हा होता.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद पांडू आलाम सभागृहामध्ये उपस्थित ११०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासातील सातत्य, जिद्द व चिकाटीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, “स्पर्धा ही स्वत:सोबतच आहे. अभ्यासात सातत्य ठेवा, सराव पेपरद्वारे आपल्या तयारीचा आढावा घ्या, आणि मेहनतीने यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे व जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रेरणा दिली..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी, सिरोंचा यांसारख्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेमध्ये सहभागी होऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन पेनगुंडा हद्दीतील १५ विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेत सहभाग घेतला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

या सराव परीक्षेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलिस ठाणी, नागरी कृती शाखेचे अधिकारी, तसेच पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतीश देशमुख हे देखील उपस्थित होते. यावेळी पोलीस विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर आणि मीडिया डेव्हलपर कोर्सेसबाबतही माहिती देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या आणि गुणवत्ता लक्षात घेता, अशा प्रकारचे उपक्रम म्हणजे भविष्यातील शासकीय नोकरभरतींसाठी भक्कम पायाभरणी ठरणार आहेत. “प्रोजेक्ट उडाण” सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना फक्त संधीच नव्हे, तर योग्य दिशा आणि आत्मविश्वास देखील प्राप्त होत आहे.

Comments are closed.