Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनधिकृत बालगृहांविरोधात तात्काळ कारवाईसाठी नागरिकांनी पुढे यावे – महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: पुणे जिल्ह्यातील आळंदी तसेच ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर बालगृहे, वसतीगृहे व अनाथाश्रमांमध्ये बालकांवर होत असलेल्या अत्याचारांचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. संबंधित संस्थांमध्ये मुलांना अनधिकृतपणे ठेवून त्यांच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे समाजमन हादरून गेले आहे.

ही संपूर्ण बाब बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ तसेच सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम, २०१८ यांचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, नोंदणी नसलेल्या संस्थांचे संचालन करणाऱ्यांना एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा, एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्ह्याचे महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणतीही अनधिकृत बालसंस्था, वसतीगृह अथवा अनाथाश्रम कार्यरत असल्याची शंका आली, तर तत्काळ तक्रार नोंदवावी. यासाठी नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

“बालकांचे संरक्षण हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर समाजातील प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या परिसरातील अनियमितता निदर्शनास आणून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही भांदककर यांनी स्पष्ट केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.