Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परराज्यातील धान आढळून आल्यास कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत दिल्या सूचना

गडचिरोली, दि. 23 डिसेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धान खरेदी केंद्रावर विकल्याचे आढळल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते आज व्हीसी द्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांच्या आढावा घेत होते. राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर मिळविण्यासाठी इतर राज्यातून गैर मार्गाने धान मोठया प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

आपल्या राज्यातील वाढीव दर व बोनसचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. गैरमार्गाने येणाऱ्या धानावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी प्रक्रिया राबवा अशा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यात याबाबत दक्षता घेणेत येत असल्याचे सांगून यापुढे अशा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच आंतरराज्य सीमांवर चेक पोस्ट लावणे, वाहनांची तपासणी करणे याकरीता लेखी आदेशही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासकीय धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनाच बोनस दिला जाणार आहे. जवळील राज्यातून येणाऱ्या धानास कोणत्याही प्रकारे खरेदी करु नये अशा सूचना प्रशासनाकडून लेखी स्वरूपात देणेत आल्या आहेत असे ते पुढे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हात इतर राज्यातून येणाऱ्या सीमांवर चेकपोस्ट : जिल्हयात बाहेर राज्यातून व इतर जिल्हयातून येणाऱ्या धानावर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत. पोलीस, आरटीओ तसेच महसूल विभाग अशा वाहतूक करणाऱ्या वाहन व वाहन मालकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. इतर राज्यातून गैरमार्गाने धान वाहतूक करून जिल्हयात विक्री करण्यास बंदी आहे. याबाबत स्थानिक शेतकरी यांनी आपले सात बारा तसेच बँकेचे तपशील अशा गैर व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना देवू नयेत असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी अशी काळजी घ्यावी : धान उत्पादक शेतकरी व्यतिरीक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही इसमाने संबंधित केंद्रावर धान विक्री करणेसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचेवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता येताना सोबत आधारकार्ड व चालु असलेले बँकेच्या बचत खात्याचे पासबूक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे, असा चालु वर्षाचा 7/12चा उतारा आणणे अनिवार्य राहील. धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापारी, दलाल, मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. तथापि, धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांनी धानाचे विक्री केली असल्यास त्यांना चालु वर्षाचा नमुना 7/12 व बँक खात्यांचा तपशील देणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी जिल्हयातील शेतकरी बांधवाना केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.