Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चळवळी आणि राजकारण !

ज्येष्ठ पत्रकार/विचारवंत रणजीत मेश्राम यांचा हा चिंतनीय लेख.. साभार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

. . . राजकीयकरण !

राजकीयकरण ( politicalization ) ही संज्ञा आता वेगाने रुजते आहे. आतापर्यंत या संज्ञेची समज ब्राह्मण व मुस्लिम यांचेकडेच दिसायची. आता इतर समाजघटकातही ती मूळ धरीत आहे. राजकीयकरण म्हणजे थोडक्यात, राजकीय समज ( political understanding ) येणे !

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या संज्ञेला व्यक्तिगततेत घेऊ नये. ती निव्वळ सामाजिक घ्यावी. तिचा थेट संबंध व्यवस्थेशी येतो. व्यवस्था म्हणजे भारतीय व्यवस्था. जी आजही कमीअधिक प्रमाणात परिणामासह जीवंत आहे. जी वाहत्या राजकीय पडसादात क्षीण किंवा घट्ट होत जाते. इथेच तिचा पोत कळतो. ती कोणत्या समाजघटकाच्या हिताची अन् कोणत्या समाजघटकाच्या अहिताची ! ती कशी ? व का ? ही जाण येणेच राजकीयकरण ! ही पुस्तकपानावरुन नसते. चळवळीच्या उजळणीतून आलेली असते. तिचे येणे चाहुल देते. समाजघटकाची सामाजिक व आर्थिक स्थिती अशी का ?

बंदिस्त व्यवस्थेने ती न येण्याचा बंदोबस्त केला होता. समजा आलीच तर , जातमेळाव्याकडे , जातपुरुषाकडे , भक्तीकडे , मंदिराकडे वळते केले. लोक त्यात रमले. या रमण्यात काळ सरकत गेला. पण हा सगळा चौसर माणसांशी संबंधित होता. अन् माणूस चौकस आहे. ही चौकसताच त्याला बंधमुक्त करायला बाध्य करते. त्यातुनच राजकीयकरणाला पालवी फुटत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ब्राह्मणांची सर्वात मोठी खंत म्हणजे त्यांचेकडे संख्या नाही. संख्याशास्त्र आहे. ते त्यांचेच ! राजकारणात ते चिरेबंद आहेत. पण संख्या कुठाय ? बोलताही येत नाही. सामना पडला लोकशाहीशी ! त्यांच्या मर्यादा याच त्यांच्या बाध्यता झाल्यायत. त्यांनी हिन्दुत्वात स्वतःला सुरक्षित केलय. ते यशस्वी झालेत. पण स्थायित्व किती ? दोनचार पिढ्या जातील. पण घसरण नक्की राहील. कारण जाणतेचा आवाका ( understanding ) वाढत जाणार ! प्रासंगिक लाभात दीर्घ तोट्याचा खेळ सुरु आहे. सत्ता येते पण द्वेष कुणाचा वाढतो ? लाभार्थी कोण अन् द्वेषार्थी कोण ? कानोसा घ्यावा. स्वयंस्फूर्त द्वेष कुणाचा वाढतोय ?

मुसलमानांनी अलिकडे मौन धारण केलय. ते प्रतिक्रिया देत नाहीत. आघातांची तालिका सुरुहै. तरीही मौन आहेत. डीएनए सांगितल तरीही मौन आहेत. बोलण्याचा राजकीय फायदा कुणी घेतला हे त्यांना कळलय. रोज खुसपट काढून डिवचल्या जातात. तरीही मौन आहेत. राजकीयकरणाचे हे जबरदस्त संकेत आहेत. ते गरीब जरुर आहेत. पण राजकीयदृष्ट्या संपन्न आहेत. उठसुठ प्रतिक्रिया देणारा पोरखेळ त्यांच्यात नाही. शिवाय त्यांचेकडे मोठी नसली तरी संख्या आहेच !

ब्राह्मणेतर खुलावर्ग राजकारणात रस घेतांना दिसतोय. सेव्ह इंडिया , सेव्ह मेरीट त्यांचेच. पण असले प्रतिक्रियावादी राजकारण अल्पजीवी असते. जिकडे जोर तिथे नाचे मोर. कागदावर जैन व जयघोषात हिन्दू हेही असतय. कोण कुणाला वापरतय ? तरीही एक नवी व्होट बँक तयार झाली हे खरय. अलिकडे बदललेली श्रीमंतसुखाय धोरणे ही त्यांचेसाठीच !

खुल्या वर्गानंतर सगळ्यात तळचा जो वर्गसमूह , तो नेहमी गर्दीत हरविला. त्याचा स्वतःचा चेहरा नव्हताच. तो कधी प्रेक्षक कधी श्रोता कधी मजूर तर कधी जनता. व्यवस्थेने तसेही याला कुरुप केलेले ! याला स्वतःचा राजकीय चेहरा नव्हताच. तो देण्याचा पहिला न्याय बाबासाहेबांनी केला. आयुष्याचे देखणेपण कशात हे हळूहळू स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हे सामाजिक स्तरावर होते. आम्ही लोक ( people ) तर आहोतच , शिवाय या देशाचे भागधारक ( shareholder ) पण आहोत ही जाणीव त्यात होती. शिवाय आपले भले आपल्यालाच करावे लागेल या मुक्तीपथाची स्पष्टता होती.

याचे पडसाद उमटले. यश आले. अपयश आले. धाव सुरू आहे. तो स्वतंत्र विषय ठरावा. पण , या देशात अनुल्लेखाने मारलेली ही राजकीय क्रांती होती. ती निवडणुकीच्या निकालावर पडताळणे सुलभीकरण होईल. या क्रांतीला प्रतिक्रिया वा प्रतिशोध म्हणता येत नाही. हे स्वतःच्या मशागतीने उमलणे होय. कसेल त्याची जमीन मग नसेल त्याचे काय हे ताकदीने विचारणारी राजकीय लढाई होती. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकीय घटनांचा अन्वयार्थ लावण्याची जाण येणे हे महत्त्वाचे ठरले. ही जाण अधिक विकसित व विस्तारित होत गेली.

राजकीयकरणातली विशेष लक्षवेधी म्हणजे ओबीसींची ! ही वेधता वाढतेच आहे. त्यांना अंकगणीतीय हिन्दुत्व कळायला आले आहे. एकेक बोट की मुठ हेही कळलय. दोन मंत्री की धोरणावर हक्क हेही समजलय. प्रासंगिक की पिढीचे हे स्पष्ट होत आहे. मानसिक स्वास्थ्य लाभले की भूक वाढत असते. धन , साधन , संसाधन कुणाकडे ? विकासाला मानवी चेहरा किती ? धोरणात संधी कोणत्या ? वाटा किती ? निर्णयप्रक्रियेत स्थान काय ? हे प्रश्न त्यांना पडत आहेत. हे प्रश्न म्हणजेच राजकीयकरण. इथेच उत्तराचे सार आहे. ते सार सहजरित्या सत्तेकडे घेऊन जाते. जगात जे काही मिळाले ते प्रश्न पडण्याने मिळाले. ते पडले की उत्तर घेता येते. ओबीसींना प्रश्न पडणे ही अलिकडची मोठी राजकीय घटना आहे. कदाचित राजकीय क्रांती … ?

विस्कटितेत सामर्थ्य नसते ! दुर्लक्षाला दुष्काळाची फळे येत असतात ! महावस्त्र देऊन झालेले वस्त्रहरण कळलेले ! हे कळणे कमी होय ? हेच राजकीयकरण !

० रणजित मेश्राम.

हे देखील वाचा :

वाघ-मानव संघर्षाचा आलेख वाढतच आहे चंद्रपूरात

एकतर्फी प्रेमामधून ओबीसींनी बाहेर यावं! – ज्ञानेश वाकुडकर

मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

 

Comments are closed.