Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंधत्वावार मात करत “त्याने” गाठलं यशाचं शिखर…

वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी मातृ पितृ छायेचं छत्र हरवलं आणि रामदास अगदी लहान वयातच अगोदर आईच्या आणि मग वडिलांच्या प्रेमाला मुकले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

पालघर, दि.४ : जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाने काही विशेष असे गुण दिलेले असतात. जस जसा मनुष्य आपल्या जीवनात मार्गक्रमण करत असतो तसे तसे त्याचे सुप्त गुण बाहेर येत असतात. आणि मग ते आपल्या जीवनात असं काही करून जातात की समाजासमोर ते एक आदर्श निर्माण करतात. डॉ रामदास येडे या अंध प्राध्यापकाने हे खरे करून दाखविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या अंधत्वावर आणि गरीब परिस्थितीवर मात करत प्रोफ़ेसर येडे या यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले हे आहेत. वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी मातृ पितृ छायेचं छत्र हरवलं आणि रामदास अगदी लहान वयातच अगोदर आईच्या आणि मग वडिलांच्या प्रेमाला मुकले. बालपणात पोरके झालेले रामदास इयत्ता तिसरीत असताना अचनाक त्यांची दृष्टी गेली आणि ते अंध झाले. अगोदर आई वडिलांची साथ सुटली आणि मग दृष्टीची ही रामदास यांच्यावर काळाने एकापाठोपाठ केलेल्या घाताने ते पार खचून गेले होते.

अशात त्यांना सावरण्यासाठी गरज होती ती मायेची आणि ममतेची. त्यावेळी त्यांना मायेची उब मिळाली ती त्यांच्या मामा कडून. अंध रामदास यांच्या मामांनी त्यांना अगदी आई सारखे सांभाळत लहानाचं मोठं केलं. त्यांचं मुंबईच्या एका दिव्यांग शाळेत सुरवातीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथे त्यांनी ब्रेल लिपि शिकली आणि हळूहळू रामदास यांच्या जीवनाला शिक्षणाने दिशा द्यायला सुरुवात केली. पुढे मुंबईहून रामदास आपल्या मामा सोबत पालघर जिल्ह्यात आले आणि त्यानी आपल्या पुढच्या शिक्षणाला पालघर च्या सोनोपंत दांडेकर या महाविद्यालयात सुरुवात केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाविद्यालयाने रामदास यांना त्याच्या पदवी आणि पदवीत्तर शिक्षणासाठी भर भरून मदत केली. त्यावेळी रामदास हे सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात शिक्षण घेणारे पहिले एकमात्र अंध विद्यार्थी होते. त्यांच्यासाठी महाविद्यालयात ब्रेल बुक, आणि इतर त्यांच्या अभ्यासासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देण्यात येत गेलं आणि रामदास घडत गेले.

राज्यशास्त्र या विषयात एम.ए केल्यानंतर त्यांनी इतिहास या विषयात एम.ए चं शिक्षण पूर्ण केलं आणि नेट आणि सेट या परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मग स्वत: शिक्षण घेतलेल्या सोनोपंत दांडेकर या महाविद्यालयात ते २०१५ पासून इतिहास विभागाचे प्रोफ़ेसर म्हणून रुजू झाले. स्वत: अंध असताना देखील त्यांनी इतर आणि दिव्यांग मुलांना शिकवायला सुरुवात केली . २०१२-२०१३ पासून महाविद्यालयात अनेक दिव्यांग मुलं शिक्षण घेऊ लागली, तेव्हापासून रामदास यांच्या हाताखाली दरवर्षी दोन ते तीन दिव्यांग विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेतून पदवी शिक्षण घेवुन बाहेर पडत आहेत.

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपितली अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. ज्याचा वापर विद्यार्थी करत असतात. प्रोफ़ेसर रामदास आपल्या अंध विद्यार्थ्याना बदलत्या काळासोबत ऑडिओ बुक साईट,लॉयल बुक साईट, कुकु एफ एम, पॉकेट एफ एम स्टोरी टेल यासारख्या विविध अप्लिकेशनच्या माध्यमातून आज शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले अनेक अंध विद्यार्थी हे आज विविध ठिकाणी जॉब करत आहेत. कोणी बँकेत काम करत आहेत तर कोणी एल.एल.बी चं शिक्षण घेत आहेत.

अंध असलेले रामदास अंध आणि इतर विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देत असून दरवर्षी ते अनेक विद्यार्थी शिक्षित करत आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने अनेक दिव्यांग विद्यार्थी आज शिक्षणासाठी पुढे येवू लागले आहेत. प्रोफ़ेसर रामदास यांनी आपल्या अंधत्वावर मात करत यशाचं शिखर गाठून आज जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Comments are closed.