Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन वाहतूक करणारा ‘हायवा ट्रकला’ नागरिकांनी अडविल्याने प्रकरण पेटण्याची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन आणि वाहतूक करीत असतांना गावकरी नागरिकांनी ‘हायवा ट्रकला’ अडविल्याने पुन्हा वाद सुरु झाला आहे.

सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन आणि वाहतूक कामाच्या सुरुवातीलाच वाहतूक परवाना सोबत न बाळगता लोहखनिज वाहून नेणारा एक हायवा ट्रकला नागरिकांनी अडविले. सदर घटनेची माहिती मिळताच एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी घटनास्थळी पोहचून सदर ट्रकचा पंचनामा करून ट्रक तहसील कार्यालयात जमा केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन आणि वाहतूकीचे काम त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड, सेलम तामिळनाडू यांच्याद्वारे सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व काही विशिष्ट कामगार पहाडावर तळ ठोकून बसले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित परिसर दुर्गम आणि नक्षलग्रस्त असतानादेखील याठिकाणी कुठलीच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा सर्व अजब प्रकार सुरू असतांनाच २८ मे २०२१ रोजी लोहखनिज वाहतुकीची परवानगी नसताना ओडी ०९ जे ३६०७ या क्रमांकाच्या हायवा ट्रकमधून लोहखनिज वाहतूक करण्यात येत होती. सदर ट्रक परिसरातील नागरिकांनी वनउपज तपासणी नाक्याजवळ अडविला होता. नागरिकांचे रौद्ररूप पाहून एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेची संपूर्ण चौकशी व पंचनामा केला असता ट्रकचालकाकडे कुठल्याही स्वरूपातील वाहतूक परवाना उपलब्ध नव्हता.

शिवाय ही वाहतूक त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कारवाईचा भाग म्हणून हा ट्रक तहसिल कार्यालयात नेण्यात आला. मात्र त्यानंतर काही वेळातच अचानकपणे याठिकाणी संबंधित वाहतुकदारांनी वाहतूक परवाना सादर केला.
विशेष म्हणजे, परवाना प्राप्त झाल्यानंतरदेखील ट्रकमध्ये नेमका किती लोहखनिज होता, हे यंत्रणेने स्पष्ट केलेले नाही. तर त्यात अंदाजे वीस मेट्रिक टन लोहखनिज होते, असा उल्लेख तहसीलदार शेवाळे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना २९ मे २०२१ रोजी पाठविलेल्या पत्रात केला आहे.

त्यामुळे वाहतूक परवाना आणि नेमका किती लोहखनिज वाहतूक होत आहे, याचा स्पष्ट विरोधाभास प्रकर्षाने पुढे आला आहे. दुसरीकडे, स्थानिकांचा विरोध पुन्हा पेट घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.