माझा आवाज दाबला तरी मी गनिमी काव्याने बोलतच राहणार ! – सुषमा अंधारे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जळगाव, 05 नोव्हेंबर :- माझ्या सभेला परवानगी नाकारली या विरुद्ध मी माननीय न्यायालयात याचिका दाखल करणार असून त्यात मी काय आक्षेपार्ह विधान केले आहे ते तपासावे अशी विनंती करणार आहे. माझा आवाज दाबला तरी मी गनिमी काव्याने बोलतच राहणार असे सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या जळगांव मधील मुक्ताईनगर मधील महाप्रबोधन सभेला स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर सुषमा अंधारे यांनी ऑनलाइन सभा घेऊन जनतेशी संपर्क साधला.
महाप्रबोधन यात्रा ही महाराष्ट्र जोडण्यासाठी करण्यात येत आहे. परंतु मंत्री गुलाबराव पाटील हे जाणीवपूर्वक जातीपातीचे राजकारण करून दिशाभूल करीत आहेत. मी कोणतेही विधान भाषणात करतांना संविधानाच्या चौकटीत, महापुरुषाचे कोट देऊन, संतांचे दाखले देवून भाषण करते. त्यामुळे मी भडक भाषण करून सामाजिक तेढ निर्माण करते हे म्हणणे चुकीचे आहे असे विधान सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात केले.
मुक्ताईनगरहून सुषमा अंधारे या बीड जिल्ह्यातील परळी येथील सभेस मार्गस्थ झाल्या, त्यावेळी त्यांच्या मोटारीवर स्थानिकांनी फुले उधळली. आता मुक्ताईनगर मधील पुढील सभा उद्धव ठाकरे यांची होणार आहे, असे समजते.
हे पण वाचा :-
Comments are closed.