Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माकडाने केला तीन विद्यार्थ्यांवर हल्ला

गडचिरोलीच्या कॉम्प्लेक्स भागातील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  कॉम्प्लेक्स परिसरात  विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुले, आयटीआय, सहायक आयुक्त समाजकल्याण, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, एलआयसी कार्यालय, तसेच नगर पालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक संकुल शाळा आहे. विशेष म्हणजे या कार्यालय व शाळा परिसरात विविध प्रकारची मोठमोठी झाडे आहेत. या झाडांवर माकडे मोठ्या संख्येने मुक्त  संचार करीत असतात.

मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहराच्या विविध भागांत माकडांचा उपद्रव वाढला असून, माकडांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या  घटनामध्ये वाढ झाल्याने गडचिरोलीतील नागरिक धास्तावले आहेत. या माकडांमध्ये पाय नसलेले एक माकड असून ते  गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले असून अनेकांना चावा घेत आहे. सोमवारला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद संकुल शाळेचे विद्यार्थी वर्गाच्या बाहेर पटांगणात बाकावर बसून भोजन करीत असताना झाडावर असलेल्या माकडाने हल्ला करीत वर्ग पाचवीचा विद्यार्थी अक्षय गावडे याला चावा घेतला, तर अंश भैसारे याला ओरबाडले आहे. शिक्षकांनी या दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना  जिल्हा महिला रुग्णालयात आणून उपचार केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसऱ्या दिवशी मंगळवारला समाजकल्याण विभागाच्या ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी आलेल्या समीर मडावी नावाच्या  विद्यार्थ्याला माकडाने ओरबाडले. दरम्यान, त्याच परिसरात माकडांच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या जलद बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करून घेतला.

वन विभागाच्या जलद बचाव दलाची चमू उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कॉम्प्लेक्स भागात फिरत असून  जाळी, काठ्या व इतर साहित्य वाहनात घेत सदर दलाचे दहा ते बारा कर्मचारी त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, चावा घेणाऱ्या व ओरबाडणाऱ्या त्या माकडाची ओळख पटली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो जेरबंद होणार, असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत शेकडो मुले-मुली शिक्षण घेत असून, शाळा परिसरात माकडांचा उपद्रव वाढल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक भयभीत झाले आहेत. या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला करून जखमी केले. त्यामुळे वन विभागाने तातडीने सदर माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शीतल भैंसारे व सदस्य शीतल सहारे यांनी केली आहे.

हे ही वाचा,

ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव !

गोंडवाना विद्यापीठात ‘वाचन पंधरवडा’ उपक्रमाचे आयोजन

गृहखात्याकडून छाननी झाल्यानंतर मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार

 

Comments are closed.