साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार
भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करणार :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि.१ ऑगस्ट : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना या समजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
चेंबूर येथील फायनस कल्चर सेंटर मध्ये आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १०२ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार राहुल शेवाळे,आमदार प्रकाश फातर्पेकर,सुधाकर भालेराव, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई गोखले, माजी अध्यक्ष श्री गोखले,समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी)चे महासंचालक धम्मज्योती गजभिये,सहसचिव दिनेश डिंगळे ,साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळाचे संचालक अनिल आहिरे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे खूप मोलाचे योगदान होते. सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य व पोवाडा यातून तत्कालीन परिस्थितीचे यथार्थ प्रतिबिंब दिसते. त्यांनी अविरतपणे वंचितांसाठी काम केलेच. परंतु मराठी भाषेची पताका साता समुद्रा पलीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अधिकाधिक सक्षम करून या समाज घटकाचा
सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येतील, असे श्री शिंदे यांनी सांगितले.
परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत होते.त्यांच्या शब्दात धार होती.त्यांना सामान्य माणसाच्या वेदना माहिती होती.त्यांना शिकायची संधी मिळाली नाही तरीही त्यांनी लिहिलेले साहित्य हे २७ भाषा मध्ये प्रकाशित झाले.अनेक देशांत त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट् विद्यार्थ्यांनी मिळवली. त्यांच्या लिखाणात वैश्विक जाणीवा असलेली विचारधारा होती.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसांच्या, वंचितांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘ही पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, श्रमिकांच्या तळ हातावर तरली आहे’ हे त्यांचे वाक्य लोकप्रिय आहे.
कुसुमताई गोखले यांनी केलेल्या मागण्या संदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना तसेच विनातारण कर्ज योजनेबाबत मुख्यमंत्री महोदय निर्णय जाहीर करतील.वस्ताद लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींना चालना देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेवून मातंग समाजाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळाचे संचालक अनिल आहिरे यांनी प्रास्ताविक केले.स्वागत समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी केले.
प्रवासी वाहतुकीकरिता कर्ज योजनेसाठी गौरव लोंढे यांना कर्ज याजनेचा धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मी येडवे यांना शौर्य पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते कसुमाताई गोखले यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी विविध मागण्या केल्या. आभार सहसचिव दिनेश डिंगळे यांनी मानले. सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.
हे देखील वाचा :
Comments are closed.