शिधापत्रिका असूनही धान्य नाही.. श्रमजीवीचा तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह..!
रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नाही, तर दिवाळी कशी गोड होणार..? - रामभाऊ वारणा यांचा सरकारला सवाल. धान्य मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात गरीब आदिवासींवर आली आहे उपासमारीची वेळ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उसगाव दि. १४ ऑक्टोंबर : एकीकडे गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या नावाने राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला शंभर रूपयात साखर,रवा, चना डाळ आणि पामतेल असे प्रत्येकी एक किलो प्रमाणे धान्यकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पालघर नाशिकसह राज्यातील बहुतांश ठिकाणी लाभार्थ्यांना शिधापत्रिका असून देखील धान्यच मिळत नसल्याने शासनाच्या या निर्णयाचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्यामुळे या कंपनी समस्या कडील शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे आज पालघर,नाशिकसह ठाणे आणि रायगडमधील तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नाही, तर गरिबांची दिवाळी कशी गोड होणार..? असा संतप्त सवाल श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी यावेळी सरकारला केला आहे.
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच्या काळात राज्यातील गरीबांची उपासमार होवू नये म्हणून शिधापत्रिकापासून वंचित असणाऱ्या आदिवासींना शिधापत्रिका मिळवून अन्न धान्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी दिनांक २६ मे २०२० रोजी पासून ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन केले होते. तसेच, मान. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्यावेळी मान. उच्च न्यायालय यांनी महाराष्ट्र शासनाला वंचित आदिवासींना तात्काळ शिधा पत्रिका देवून अन्न धान्याचा पुरवठा करावा असे आदेश दिले होते.
परंतु, माननीय उच्च न्यायालय यांच्या कडून आणि माननीय मुख्यमंत्री कार्यालय तसेच, माननीय राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून अंमलबजावणीचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा जिल्हा पातळीवर आजही अनेक लाभार्थ्यांना रेशन कार्ड असून देखील धान्य मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुरामुळे गरीबांना अंत्योदय व प्राधान्याच्या लाभार्थी म्हणून शिधापत्रिका मिळाल्या. परंतू इष्टांका अभावी धान्य मिळत नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांना धान्य मिळावे या मागणीसाठी पालघर नाशिक ठाणे आणि रायगड समोर आंदोलन करण्यात आले.
श्रमजीवी संघटनेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे २१८१ शिधा पत्रिका धारक, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या ६८८५ शिधापत्रिकाधारक असे एकूण १००६६ शिधापत्रिका धारक कुटुंब धान्यापासून वंचित आहेत. तर नाशिक जिल्ह्यात एकूण ८६५२ शिधापत्रिका धारक कुटुंब धान्यापासून वंचित आहेत. अशाच प्रकारची परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आहे.
त्याचप्रमाणे, गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला शंभर रूपयात साखर,रवा, चना डाळ आणि पामतेल असे प्रत्येकी एक किलोचे धान्यकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शिधापत्रिका असून देखील धान्यच मिळत नसल्याने शासनाच्या या निर्णयाचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्यामुळे दिवाळी गोड करण्याचे सोडा, या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे सामान्य, गरीब आदिवासी, दुर्बलांच्या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा तसेच संस्थापिका विद्युलता पंडित, सरचिटणीस विजय जाधव बाळाराम भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ सापटे तसेच प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
श्रमजीवी संघटनेच्या मागण्या :-
१) प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना तात्काळ
अन्न धान्य देण्याची व्यवस्था करावी.
२) अंत्योदय व प्राधान्याच्या इष्टांक अभावी वंचित असणाऱ्या गरीबांना अन्न धान्य मिळावे यासाठी इष्टांकामध्ये तात्काळ वाढ करण्यात यावी.
३) ऑनलाईन न झालेल्या शिधापत्रिका तात्काळ ऑनलाईन करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा.
४) दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने शासनाच्या शंभर रूपयात धान्यकिट देण्याच्या (साखर,रवा, चना डाळ आणि पामतेल) निर्णयाचा लाभ प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला मिळावा. (त्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत, परंतु धान्य मिळत नाही त्यांना देखील लाभ मिळावा)
या मागणीसाठी करण्यात आलेल्या आजच्या सत्याग्रह आंदोलनाची दखल घेत प्रत्येक तहसीलदारांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत याचा सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
हे देखील वाचा :
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता.
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा संशयास्पद मृत्यू ?
Comments are closed.