Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनामुळे अस्तंबा येथील अश्वत्थामा यात्रा रद्द.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नंदुरबार, दि. ८ नोव्हेंबर: कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील धडगाव पोलिस ठाण्याअंतर्गत अस्तंबा येथील श्री. अश्वत्थामा ऋषींची यात्रा, तळोदा येथे दिपावलीच्या दिवशी काढण्यात येणारी भाविकांची मिरवणूक, रंजनपूर (मोरवड) येथील आप मूळ धर्म सती-पती आरती पूजन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नंदुबार पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, दरवर्षी धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे श्री. अश्वत्थामा ऋषींची यात्रा भरविण्यात येते. या यात्रेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातमधील ४०-५० हजार भाविक सहभागी होत असतात. त्यांच्यापैकी काही भाविक तळोदा येथील मारूती मंदिरात पूजा करून अस्तंबा शिखरावर जातात. तेथे लक्ष्मीपूजन दिवशी तळोदा येथील कॉलेज रोडवर चौफुली परिसरात येतात. चौफुली चौकात मुक्कामी थांबतात. त्यानंतर तेथून दिपावलीच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत कॉलेज रोड ते मारूती मंदिरापर्यंत गटागटाने पारंपारिक पद्धतीने ढोल व ताशा वाजवित मिरवणूक काढतात. त्या मिरवणुकीत २०-२५ हजार गावकरी सहभागी होतात. दिवाळीलाच सायंकाळी ६ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजतापर्यंत मोरवड (रंजनपूर) येथे संत गुलाम महाराज  व संत रामदास महाराज यांच्या समाधीस्थळी आप मूळ धर्म सती-पती आरती पूजक समाजाचा आरतीपूजन सोहळा होतो.
यावर्षी ११ ते १४ नोव्हेंबरपर्यंत चार दिवस श्री. अश्वत्थामा ऋषी अस्तंबा यात्रेचा कालावधी आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी मोरवड येथे आरतीपूजन आहे. हे दोन्ही सोहळे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मिरवणूक न काढता साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या संदर्भात धडगाव व तळोदा पोलिस स्टेशनला यात्रा आयोजक, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी व गावकऱ्यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. त्यामध्ये यात्रा महोत्सव, पूजन सोहळा व मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. त्या काळात दोन्ही गावांमध्ये पोलिस बंदोबस्त राहणार आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी कळविले आहे.

Comments are closed.