छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये पार पाडतील
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३ एप्रिल: महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.
पुण्यदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आज तीनशे वर्षांनंतरही महाराजांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरु आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट आज सगळ्यात मोठं आहे. या संकटाचा मुकाबला करताना, सरकार आणि नागरिक दोघेही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केला.
Comments are closed.