Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक वन दिन: ४३ ठिकाणी बहरली मुंबईच्या पर्यावरणाला पूरक ठरणारी मियावाकी वने

४३ मियावाकी वनांमध्ये ५० पेक्षा अधिक प्रजातींची तब्बल २,२१,४०५ झाडे

१५ ठिकाणी नागरी वनांची कामे प्रगतीपथावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क, दि. २१ मार्च: सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई शहराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्या वर्षी पासून राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी गणराज्य दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून ‘मियावाकी’ वनांच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्राचे माननीय पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध ५७ ठिकाणी मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची (Urban Forest) टप्प्याटप्प्याने रुजवात करण्यात येत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या ४३ ठिकाणच्या मियावाकी वनांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे‌. या ४३ ठिकाणी तब्बल २ लाख, २१ हज़ार ४०५ झाडे लावण्यात आली असून यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच कमाल ५ ते ७ फुटांची उंची गाठली आहे. केवळ वर्षभरात या वनांमधील झाडांनी एवढी उंची गाठणे, हे वनांची वाढ योग्य प्रकारे होत असल्याचे लक्षण आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय पर्यावरण पूरक उपाययोजना सातत्याने राबवित असते. याच उपाययोजनांचा भाग म्हणून गेल्या वर्षीपासून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने जपानी पद्धतीच्या ‘मियावाकी’ वनांची लागवड करण्यात येत आहे. कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी ‘मियावाकी’ वने ही आपल्या कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूर सारख्या शहरांमध्ये असणाऱ्या ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पनेशी नाते सांगणारी आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात रुजवात करण्यात आलेल्या ४३ वनांसोबतच आणखी १५ ठिकाणी मियावाकी वनांची कामे प्रगतिपथावर आहेत. विशेष म्हणजे आकारास आलेल्या ४३ मियावाकी वनांपैकी १४ वने ही ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ मधून किंवा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने फुललेली आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ४३ ठिकाणी वाढत असलेल्या मियावाकी वनांमध्ये विविध ५० प्रजातींची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

हे वाचा – जागतिक चिमणी दिन; चला चिमण्यांसोबत राहूया

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ४३ ठिकाणी ‘मियावाकी’ वने आता आकारास आली असून या वनांसाठी उपलब्ध झालेल्या भूखंडाच्या आकारानुसार वनांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे तब्बल ३८ हजार ८२९ एवढी झाडे ही महापालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभागातील ‘आयमॅक्स’ थिएटर जवळच्या भक्ती पार्क उद्यानातील भूखंडावर आहेत. तर या खालोखाल ‘एल’ विभागातील एका भूखंडावर २७ हजार ९०० झाडे आणि चेंबूर परिसरातील पूर्व मुक्त मार्गालगतच्या महापालिकेच्या अखत्यारितील एका भूखंडावर २१ हजार झाडे लावण्यात आली आहे. ‘पी उत्तर’ विभागातील मालाड पश्चिम परिसरात असणा-या मनोरी गावालगतच्या एका भूखंडावर १८ हजार ७०० झाडे आहेत. या ४ मियावाकी वनांव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ३९ ठिकाणी ‘मियावाकी’ वने आता आकारास आली आहेत. तर आणखी १५ ठिकाणी वने फुलविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Comments are closed.